
श्री गिरुवाजी पार्श्वनाथ जैन मंदिराच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रम
अमळनेर (प्रतिनिधी) येथील सराफ बाजारातील श्री गिरुवाजी पार्श्वनाथ जैन मंदिराच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य आणि भक्तिमय अशा आठ दिवसीय धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या हीरक महोत्सवी सोहळ्यानिमित्त विविध पूजाविधी, मिरवणुका आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या सोहळ्यानिमित्ताने रविवार, दि. १९ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता परमात्मा व ध्वजा मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ६.३० वाजता मनमोहक महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मंगळवार, दि. २१ एप्रिल रोजी श्री सत्तरभेदी पूजेचा कार्यक्रम होणार असून सकाळी १० वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र देशोद्वारक व्याख्यान वाचस्पती प.पू. आचार्यदेव श्रीमद विजय रामचंद्रसुरीश्वरजी महाराजा यांच्या आशीर्वादाने आणि प.पू. मुनीश्री हितरक्षितविजयजी म.सा., प.पू. मुनीश्री विनयरक्षितविजयजी म.सा. तसेच प.पू. मुनीश्री हिरण्ययशविजयजी म.सा. यांच्या पावन सानिध्यात हे सर्व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
या निमित्ताने सुमारे १५० वर्षे प्राचीन श्री श्यामळिया पार्श्वनाथ भगवान तसेच अचिंत्य चिंतामणी आणि ५०० वर्षे प्राचीन, प्रगट प्रभावी श्री गिरुवाजी पार्श्वनाथ भगवान यांच्या दर्शनाचा लाभ भाविकांना मिळणार आहे. या सर्व धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहून दर्शन व गुरुमहाराजांचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन श्री गिरुवाजी पार्श्वनाथ श्वेतांबर मूर्तिपूजक तपागच्छ जैन संघ संस्थान, सराफ बाजार, अमळनेर यांनी केले आहे.

Leave a Reply