उष्णतेमुळे एकाच दिवशी चार ठिकाणी आगी; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

अमळनेर (प्रतिनिधी) दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या तापमानामुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, शुक्रवारी (११ रोजी) एकाच दिवशी चार वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. मात्र अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे सर्व आगींवर वेळेत नियंत्रण मिळवण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला.

दुपारी सुमारे बारा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास पारोळा तालुक्यातील बोदरडे येथील पांडुरंग पाटील यांच्या मक्याच्या शेतात डीपी शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. पारोळा येथील अग्निशमन दल अपुरे पडण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी अमळनेर येथील अग्निशमन दलाची मदत तातडीने रवाना केली. प्रमुख गणेश गोसावी यांच्यासह दिनेश बिऱ्हाडे, फारूख शेख, जफरखान पठाण, मच्छीन्द्र चौधरी, भिका संदानशीव, वसीम पठाण, लखन कंखरे, आकाश बाविस्कर आणि अजय बिऱ्हाडे यांनी ही आग आटोक्यात आणली.

दरम्यान, पारोळा येथील आग नियंत्रणात येताच अमळनेर शहरातील पैलाड भागात दूध डेअरीजवळ चारा व शेणखताला आग लागली. अग्निशमन दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेत आग विझवली. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ॲड. ललिता पाटील यांच्या घराजवळील पिंपळाच्या झाडाला आग लागली. दिवा लावल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून तीही तात्काळ नियंत्रणात आणण्यात आली. याचवेळी सराफ बाजारातील अग्रवाल डेअरीजवळील पडीत जागेतही आग लागली होती. या आगीवरदेखील अग्निशमन दलाने वेळीच नियंत्रण मिळवले. एकाच दिवशी चार ठिकाणी आगी लागल्याने अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ झाली. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान टळल्याने नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *