
अमळनेर उपविभागातील ३४ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांच्या ताब्यात
‘मुद्देमाल सुपूर्द मोहिमे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

अमळनेर (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘मुद्देमाल सुपूर्द मोहिमे’ अंतर्गत शनिवारी (दि. ११ जुलै) पद्मालय हॉल, जळगाव येथे भव्य कार्यक्रम पार पडला. या उपक्रमात अमळनेर उपविभागातील विविध पोलीस ठाण्यांमधील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेला ३४ लाख ८ हजार ४१५ रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन तसेच वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे उपस्थित होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक बाजीराव कोते उपस्थित होते.
अमळनेर पोलीस ठाण्याकडून सर्वाधिक मुद्देमाल सुपूर्द
अमळनेर पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यांमधील सुमारे ७० ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत १० लाख ४६ हजार ४१५ रुपये), ७ लाख ३ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच ३ लाख १८ हजार रुपये किमतीचे २६ मोबाईल फोन असा एकूण २० लाख ६७ हजार ४१५ रुपयांचा मुद्देमाल संबंधित मालकांना परत करण्यात आला.
पारोळा पोलीस ठाण्याचा मुद्देमालही परत
पारोळा पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला मारुतीच्या मूर्तीचा ५०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट, १५० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या मासळ्या तसेच १४ मोबाईल फोन असा एकूण ४ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल संबंधितांना सुपूर्द करण्यात आला.
एरंडोल व मारवड पोलीस ठाण्यांचाही सहभाग
एरंडोल पोलीस ठाण्याकडील विविध गुन्ह्यांमधील स्वराज ७४४ एक्सटी, न्यू हॉलंड ३२३० आणि सोनालिका छत्रपती मॉडेलचे तीन ट्रॅक्टर, तसेच तीन मोबाईल फोन असा ८ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आला. तर मारवड पोलीस ठाण्याकडून जप्त करण्यात आलेली हिरो कंपनीची मोटारसायकल संबंधित मालकाला परत करण्यात आली.
या मोहिमेमुळे नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना त्यांचा जप्त मुद्देमाल जलदगतीने परत मिळावा, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले.
उत्कृष्ट कामगिरीचा गौरव
कार्यक्रमात जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच पोलीस पाटील यांचा गौरव करण्यात आला. अमळनेर उपविभागातील मंगरुळ (ता. अमळनेर) येथील पोलीस पाटील भागवत बापू पाटील यांनी अमळनेर पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर क्रमांक २९९/२०२६ मध्ये विशेष योगदान दिल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अमळनेर उपविभाग यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे नागरिकांना त्यांचा मुद्देमाल वेळेत परत मिळण्यास मदत झाली असून, हा उपक्रम पोलीस प्रशासनाच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे उत्तम उदाहरण ठरल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply