
मंगल’ महाजागरातून श्री मंगळ जन्मोत्सवाचा भक्तिमय सोहळा; मंगळग्रह मंदिरात दिवसभर भक्तीचा सागर
अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्री मंगळग्रह मंदिरात भाद्रपद शुद्ध दशमी अर्थात सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी पहाटेपासून सुरू झालेला ‘मंगल’ महाजागर भाविकांनी दिवसभर अनुभवला. निमित्त होते मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे आयोजित परम पवित्र श्री मंगळ जन्मोत्सव सोहळ्याचे. श्री मंगळग्रह देवांची विश्वातील एकमेव स्वयंभू मूर्ती असलेल्या श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा अत्यंत चैतन्यमय आणि भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक विधींनी उत्साहात साजरा करण्यात आला.
पहाटे ४ वाजता श्री मंगळ जन्मोत्सव सोहळ्याचे विशेष मानकरी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते श्री मंगळग्रह देवांच्या मूर्तीवर वैशिष्ट्यपूर्ण पंचामृत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी ६ वाजता दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे ध्वजाचे मानकरी योगेश पांडव यांनी परिवारासह वाद्यवृंदाच्या गजरात नवे ध्वज मंदिरात आणले. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे, आनंद महाले, फुलराणी ग्रुपच्या महिला भगिनी, व्हॉईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी, मंगल सेवेकरी आशाताई महाले, प्रकाश मेखा, व्ही. व्ही. कुलकर्णी, ए. डी. भदाणे, पुषंद ढाके, आशिष चौधरी यांच्यासह सेवेकरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी ध्वजाचे तसेच ध्वजाचे मानकरी योगेश पांडव व त्यांच्या पत्नीचे औक्षण केले. संबळ वादन आणि भेरच्या निनादाने परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले. सकाळी साडेसहाच्या सुमारास फुलांनी सजवलेल्या पाळण्यात श्री मंगळग्रह देवांचा प्रतिकात्मक जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर भाविकांनी सामूहिकरित्या देवांचा पाळणा म्हटला. सकाळी ७ वाजता ध्वजपूजन करून विधिवत कळसावरील तसेच मुख्य प्रवेशद्वारावरील जुने ध्वज उतरवून त्या ठिकाणी नवे ध्वज लावण्यात आले. मंदिराच्या सुरक्षेसाठी कार्यरत माजी सैनिकांनी ध्वजाला मानवंदना दिली. सकाळी ८ वाजता श्री मंगळग्रह देवांची महाआरती झाली. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता संभाजीनगर येथील किशोर आणि श्रीकांत या उपाध्याय बंधूंनी श्री मंगळग्रह देवांना ५६ भोगांचा महाप्रसाद अर्पण केला. यावेळी प्रांताधिकारी मयूर भंगाळे उपस्थित होते. दिवसभर भाविकांनी श्री मंगळग्रह देवांचा पाळणा हलवत दर्शनाचा पुण्यलाभ घेतला. त्यानंतर पुण्यातील वेंकीज कंपनीतर्फे भाविकांना मोतीचूर लाडूंचा प्रसाद वाटप सुरू करण्यात आले. हे प्रसादवाटप रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
५६ विविध फळांचा भोग
श्री मंगळ जन्मोत्सवानिमित्त अमळनेर येथील निर्गुण फूल भांडारचे संचालक वाल्मीक पाटील यांनी श्री मंगळग्रह देवांना देशी-विदेशी ५६ विविध फळांचा भोग अर्पण केला. यामध्ये आंबा, पपई, जांभूळ, केळी, कलिंगड, बोर, सफरचंद, खरबूज, चक्री लिंबू, संत्री, चिकू, म्हाळुंग, मोसंबी, अननस, कागदी लिंबू, द्राक्ष, नारळ, लिंबू, पेरू, सीताफळ, फणस, डाळिंब, रामफळ, हनुमानफळ, आवळा, पिस्ता, आटकी, करवंद, अंजीर, अळूचाळू, चिंच, खजूर, आडू, स्ट्रॉबेरी, जर्दाळू, अळू, ब्ल्यूबेरी, चेरी, काजू, रॅस्पबेरी, किवी, आक्रोड, ब्लॅकबेरी, ड्रॅगनफ्रूट, बदाम, क्रेनबेरी, पॅशनफ्रूट, एवोकॅडो, लिची, बेलफळ, स्टारफ्रूट, मंगोस्टीन, कवळ, उंबर आणि शेवगा आदी फळांचा समावेश होता. दरवर्षी विविध खाद्यपदार्थांचा ५६ भोगाचा नैवेद्य अर्पण केला जातो. यंदापासून त्यासोबत ५६ विविध फळांचा नैवेद्य अर्पण करण्याची नवी परंपरा सुरू करण्यात आली.
देशी-विदेशी फुलांनी साकारली मनमोहक मयूरपंखी सजावट
श्री मंगळ जन्मोत्सवानिमित्त मंदिराच्या ओट्यावर सजविण्यात आलेल्या पाळण्याभोवती देशी-विदेशी फुलांची आकर्षक मयूरपंखी सजावट करण्यात आली होती. ऑर्किड, सनफ्लॉवर, जर्बेरा, गुलाब, टच गुलाब, चायनीज गुलाब, विविध प्रकारच्या गॅलडो काडी, शेवंती, निशिगंध, जिप्सी, निलियम, लिली, कॅला लिली, झेंडू, आस्टर, कामिनी, डिशनरी, सोफ्लगाफूल, कटपत्ता, सूर्यपत्ता, पामपत्ता, ट्युलिप, नंदनवन पक्षी, डॅफोडिल्स, अँथुरियम, चॉकलेट कॉसमॉस आदी फुलांच्या माध्यमातून ही सजावट करण्यात आली होती. ही मनमोहक सजावट भाविकांचे विशेष आकर्षण ठरली.
जगभरातील भाविकांसाठी थेट प्रक्षेपण
मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे श्री मंगळ जन्मोत्सवानिमित्त मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या विविध धार्मिक विधींचे दिवसभर जगभरात थेट प्रक्षेपण करण्यात आले. मंगल तंत्रज्ञ आशिष चौधरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे धार्मिक विधी जगभरातील भाविकांना घरबसल्या पाहता यावेत, यासाठी थेट प्रक्षेपणाची व्यवस्था केली.
महाभोमयाग, पालखी आणि महाधुपारतीने सोहळ्याची सांगता
दुपारी १ वाजता रेती, शेती आणि मातीशी निगडित असलेल्या समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी श्री महाभोमयागाचे आयोजन करण्यात आले. श्री मंगळग्रह देवांच्या कृपेसाठी करण्यात येणारा हा याग हिंदू धर्मातील पवित्र धार्मिक विधी मानला जातो. विशेष मानकरी प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार, चोपडा आणि त्यांच्या पत्नी लताताई सोनवणे, माजी आमदार, चोपडा, डॉ. उमाताई ढेकळे, तहसीलदार, अमळनेर, प्रवीण नाना पाटील, बांधकाम व्यावसायिक, चाळीसगाव व त्यांच्या पत्नी कविताताई पाटील तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर व त्यांच्या पत्नी मंगलाताई बाविस्कर हे यागात दुपारी साडेचार वाजेपर्यंत सक्रिय सहभागी झाले.
सायंकाळी ५ वाजता श्री मंगळग्रह देवांची मंदिर परिसरातून वाद्यवृंदाच्या गजरात वाजतगाजत पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता श्री मंगळग्रह देवांची भव्य महाधुपारती करण्यात आली आणि दिवसभर सुरू असलेल्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता झाली.

Leave a Reply