
दुष्काळाच्या संकटात गरजवंतांची दिवाळी गोड करण्यासाठी ‘दिवाळी शिधा’ वाटप
अमळनेर (प्रतिनिधी) राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी, ऊसतोड कामगार आणि गरजू कुटुंबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या उद्देशाने शिवसेनेतर्फे विशेष ‘दिवाळी शिधा’ वाटप उपक्रम राबविण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार अमळनेर येथे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गरजू कुटुंबांना दिवाळी शिधा किटचे वाटप करण्यात आले.
शनिवारी शिवांश हब येथील शिवसेना कार्यालयासमोर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय योजनांव्यतिरिक्त शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवरून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा नगरसेवक गुलाब पाटील, नगरसेवक अनिल महाजन, उपजिल्हाप्रमुख प्रथमेश पवार, शिवसेनेचे उमेश पाटील, पुरुषोत्तम चौधरी, उपसरपंच अमळगाव जयेश कोळी, नरु चौधरी, धार उपसरपंच शशिकांत पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रविण पाटील, रोशन सोनवणे, दामोदर पाटील, मनोज पाटील, सागर पाटील, प्रफुल्ल पाटील, राहुल पाटील आणि यश साळुंखे यांच्यासह पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवांश हबसमोर प्रातिनिधिक स्वरूपात शिधा वाटप केल्यानंतर संपूर्ण अमळनेर विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात शिवसेना कार्यकर्त्यांमार्फत घराघरांपर्यंत शिधा किट पोहोचविण्यात येणार आहेत. अमळनेर तालुक्यात यंदा दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकरी आणि गरीब कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत गोरगरिबांनाही दिवाळीचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा करता यावा, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.

Leave a Reply