फाफोरे बु. येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीराला प्रतिसाद

अमळनेर(प्रतिनिधी) तालुक्यातील फाफोरो बु. येथे “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर उत्साहात पार पडले. या शिबिराला सुमारे ८५० ते ९०० नागरिकांची उपस्थिती नोंदवली गेली. या माध्यमातून शासकीय सेवा थेट गावपातळीवर पोहोचवण्यात आल्या.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. १८ फेब्रुवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत हे शिबर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन खासदार स्मिताताई वाघ, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी व तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या हस्ते झाले. या वेळी विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, तालुकास्तरीय शासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शिबिरामध्ये विविध विभागांमार्फत नागरिकांना अनेक शासकीय सेवा व लाभ देण्यात आले. त्यामध्ये पुरवठा शाखेमार्फत ११५ नवीन व दुबार शिधापत्रिका, संगायो शाखेमार्फत १४७ लाभार्थ्यांची डीबीटी प्रक्रिया पूर्ण, २२ हयात प्रमाणपत्रे व २१ नवीन अर्ज स्वीकारण्यात आले.

तसेच ७/१२ दुरुस्तीचे ५१ प्रकरणे, वारस नोंदी ११, फेरफार नोंदी निकाली ७ करण्यात आल्या. सेतू शाखेमार्फत २१२ उत्पन्न दाखले, ६१ राष्ट्रीयत्व दाखले, १५७ रहिवासी दाखले, ५३ जातीचे दाखले, तसेच १० आधार नोंदणी व १७ आधार दुरुस्ती करण्यात आली.

याशिवाय बालविकास विभागामार्फत ०४ लाभार्थ्यांना बेबी किटचे वाटप, तर कृषी विभागामार्फत ०२ लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. शिबिराच्या ठिकाणी विविध प्रशासकीय विभागांचे माहितीपर प्रदर्शनीय टेबलही लावण्यात आले होते.

यावेळी खासदार स्मिताताई वाघ यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रस्तावना तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी केली. तर निवासी नायब तहसीलदार सी. यू. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *