
पाईप काढला, शेत बुडाले; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ
अमळनेर (प्रतिनिधी) रस्त्याच्या कामात पाण्याचा निचरा करणारा पाईप काढून टाकल्याचा फटका गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्याला सहन करावा लागत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कथित हलगर्जीपणामुळे यंदा सुमारे सव्वा दोन हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे यावर्षी शून्य उत्पन्नाची वेळ आली असून कर्ज फेडायचे कसे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, असा गंभीर प्रश्न जैतपिर शिवारातील शेतकरी महेश बुधा कासार यांच्यासमोर उभा ठाकला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, महेश बुधा कासार यांची तालुक्यातील जैतपिर शिवारात रेल्वे गेटजवळ गट क्रमांक ७२/२/अ/१, ७२/२/ब आणि ७३ मध्ये शेती आहे. २०१९ पूर्वी या शेतातील पावसाचे पाणी बाहेर जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याखालून पाईप टाकून पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे पावसाचे पाणी शेतात साचत नव्हते. मात्र २०१९ मध्ये रस्त्याचे काम करण्यात आले. त्यावेळी पाण्याचा निचरा करणारा पाईप उखडून टाकण्यात आला आणि त्यानंतर रस्ता तयार करण्यात आला. पाण्याचा नैसर्गिक निचरा बंद झाल्याने तेव्हापासून दरवर्षी अतिवृष्टी झाली की शेतात पाणी साचून एक ते दोन बिघे पिकाचे नुकसान होत असल्याचे महेश कासार यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्वीप्रमाणे रस्त्याखालून पाईप टाकून पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करण्याची व्यवस्था करावी, तसेच प्रशासनाने शेतीच्या झालेल्या नुकसानीची दखल घेऊन योग्य तो न्याय द्यावा, अशी मागणी महेश बुधा कासार यांनी केली आहे.
आठ वर्षे तक्रारींचा पाऊस; तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष
पाण्याचा निचरा बंद झाल्यामुळे शेतीचे वारंवार नुकसान होत असल्याने महेश कासार यांनी प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रारी केल्या. २०१९ मध्ये रस्त्याचे काम सुरू असतानाच तत्कालीन जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही त्यांनी तक्रार केली होती. मात्र या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तक्रारी करूनही समस्या कायम राहिल्याने गेल्या अनेक वर्षांपासून शेतीच्या नुकसानीचा सामना करावा लागत असल्याचे कासार यांनी सांगितले. प्रशासनाने वेळीच पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था केली असती, तर आजची परिस्थिती ओढवली नसती, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
चार दिवसांपासून शेतात पाणी; कापूस पिकाचे मोठे नुकसान
३० आणि ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने परिस्थिती आणखी गंभीर झाली. सुमारे सव्वा दोन हेक्टर शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने चार दिवसांपासून पाणी शेतातच साचून आहे. परिणामी कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यंदा शेतीतून शून्य उत्पन्न मिळण्याची परिस्थिती निर्माण झाली असून, घेतलेले कर्ज फेडायचे कसे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न महेश कासार यांच्यासमोर उभा आहे.
विमा कंपनीचे उत्तरही शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ
पीक नुकसानीबाबत पीक विमा कंपनीला माहिती दिल्यानंतरही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याची तक्रार महेश कासार यांनी केली आहे. ३० जुलै रोजी विमा काढला आणि लगेच दुसऱ्याच दिवशी नुकसान झाल्याने विमा देता येणार नाही. त्यासाठी किमान १४ दिवसांचा खंड असणे आवश्यक असल्याचे विमा कंपनीकडून सांगण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. यावर संतप्त होत, “निसर्गाची आपत्ती शेतकऱ्याला विचारून येते का? विमा काढताना उद्या पाऊस पडणार आहे, हे शेतकऱ्याला माहीत असते का?” असा सवाल महेश कासार यांनी उपस्थित केला.

Leave a Reply