कळमसऱ्यात मुस्लिम तरुणाच्या पुढाकारातून गणरायाची स्थापना; हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश

अमळनेर (प्रतिनिधी) सण-उत्सव हे केवळ धार्मिक परंपरांपुरते मर्यादित न राहता सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाची वीण अधिक घट्ट करणारे माध्यम ठरू शकतात, याचा प्रत्यय तालुक्यातील कळमसरे येथे येत आहे. मुस्लिम तरुणाने गणपती बाप्पाची स्थापना करण्याचा पुढाकार घेतला आणि हिंदू-मुस्लिम तरुणांनी एकत्र येत ‘राम रहीम मित्र मंडळा’ची स्थापना केली. या मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा होत असून, गावात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला जात आहे.

कळमसरे गावातील तरुणांची पाडळसरे फाट्यावर नेहमीच गप्पांची मैफल रंगते. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी तरुण एकत्र बसले असताना नईम खान सलीम खान पठाण यांनी, ‘१४ सप्टेंबरला गणेशोत्सव आहे, चला आपण गणपती बाप्पाची स्थापना करू,’ अशी कल्पना मांडली. मुस्लिम तरुणाने मांडलेला हा विचार ऐकून उपस्थित मित्रांना सुरुवातीला आश्चर्य वाटले; मात्र सर्वांनी तत्काळ संमती देत गणरायाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. गणपतीची स्थापना करण्यासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर वसीम पठाण यांनी मशिदीच्या ट्रस्टची रिकामी जागा उपलब्ध असल्याचे सांगितले. सर्वांनी संमती दिल्यानंतर याच ठिकाणी गणपती बाप्पाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मंडळाची कार्यकारिणी स्थापन करून अध्यक्षपदी नईम खान सलीम खान पठाण, तर उपाध्यक्षपदी मोतीलाल महाजन यांची निवड करण्यात आली. मंडळाला ‘राम रहीम मित्र मंडळ, कळमसरे’ असे नाव देण्यात आले.

मंडळातील तरुणांनी एकत्र येत गणेशोत्सवाची तयारी सुरू केली. १४ सप्टेंबर रोजी विधिवत गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावकऱ्यांसाठी भंडारा आयोजित करण्याचा निर्णयही मंडळाने घेतला असून, त्यासाठी सदस्यांनी गावातून वर्गणी संकलनाला सुरुवात केली आहे. कळमसरे गावात हिंदू-मुस्लिम असा भेद न करता विविध समाजातील नागरिक सण-उत्सव एकोप्याने साजरे करतात. यंदाच्या गणेशोत्सवातूनही सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि ‘एक गाव–एक परिवार’ या भावनेचा संदेश अधोरेखित झाला आहे. मुस्लिम तरुणाच्या पुढाकारातून हिंदू-मुस्लिम तरुणांनी एकत्र येऊन गणरायाची स्थापना केल्याने या उपक्रमाचे गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *