३० वर्षांपासून पतीचे छत्र हरपले, मुलगाही नसल्याने मुलीनेच आईला खांदा देत दिला अग्निडाग

अमळनेर (प्रतिनिधी) : पतीचे छत्र ३० वर्षांपूर्वीच हरपले, मुलगाही नव्हता; मात्र मुलीने आईला कधीही एकटे पडू दिले नाही. वृद्ध आईला आपल्या घरी आणून तिचे पालनपोषण केले आणि निधनानंतर मुलगा नसल्याच्या रूढ समजुतीलाही फाटा देत मुलीनेच आईला खांदा देत अग्निडाग दिला. माणुसकी, कर्तव्य आणि मातृप्रेमाचा प्रत्यय देणारी ही घटना तालुक्यातील पिळोदे येथे घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की,  स्टेशन निंभोरा, ता. रावेर येथील मुळाबाई सोपान पाटील यांचे पती ३० वर्षांपूर्वीच त्यांना सोडून गेले होते. त्यांना मुलगा नव्हता. त्यांची एकुलती एक मुलगी आशाबाई हिचा विवाह अमळनेर तालुक्यातील पिळोदे येथील प्रभाकर दगडू पवार  यांच्याशी झाला होता. आई एकाकी जीवन जगत असल्याने आशाबाई यांनी आईला पिळोदे येथे आपल्या घरी आणले. त्यानंतर मुलगी आशाबाई आणि जावई प्रभाकर दामू पाटील यांनी मुळाबाई यांचा सांभाळ, पालनपोषण तसेच त्यांच्या दवाखान्यासह इतर सर्व गरजा पूर्ण केल्या.

वयाच्या ७५ व्या वर्षी ३ सप्टेंबर रोजी सकाळी मुळाबाई सोपान पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अंत्यसंस्काराच्या वेळी पारंपरिक रूढींना फाटा देत मुलगी आशाबाई यांनीच आईच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली. परंपरेनुसार मुलगा किंवा मुलगा नसल्यास नात्यातील पुतण्याने अंत्ययात्रेला खांदा देऊन अग्निडाग देण्याची पद्धत आहे. मात्र, आशाबाई यांनी या रूढीला छेद देत आपल्या आईला स्वतः खांदा दिला. एवढेच नव्हे तर आगारी बनून अंत्ययात्रेच्या पुढे मडके धरत त्या स्मशानभूमीपर्यंत गेल्या आणि त्यांनीच आपल्या आईला अग्निडाग दिला. आईच्या निधनानंतर उत्तरकार्य आणि गंधमुक्तीचे विधीदेखील मुलगी आशाबाई आणि जावई प्रभाकर दगडू पवार हे पिळोदे येथेच करणार आहेत. वृद्ध आईला आपल्या घरी आणून आयुष्याच्या अखेरपर्यंत तिची सेवा करणाऱ्या मुलीनेच अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडल्याने आशाबाई आणि प्रभाकर पवार यांच्या निर्णयाचे परिसरातून कौतुक होत आहे. आईच्या ऋणातून मुक्त होण्याचा नव्हे, तर तिच्या अखेरच्या प्रवासातही सोबत राहण्याचा हा भावनिक क्षण अनिष्ट रूढींना फाटा देणारा ठरला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *