
अमळनेरचा सुपुत्र सुयोग पाटील यांची डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ पदावर निवड
‘क्ला १ गॅझेटेड’ पदावर निवड; देशभरातील १ लाख ७० हजार विद्यार्थ्यांतून मिळविला ४६० वा क्रमांक

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरातील सुयोग हरेश पाटील यांची भारतीय संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. या संस्थेतील हे ‘क्लास १ गॅझेटेड’ पद असल्याने ही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची उपलब्धी मानली जात आहे.
सुयोग पाटील यांचे प्राथमिक शिक्षण अमळगाव येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण अमळनेर येथील जी. एस. हायस्कूलमध्ये पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी प्रताप महाविद्यालयात शिक्षण घेत आर. सी. पटेल तंत्रज्ञान संस्थेतून संगणक अभियांत्रिकी शाखेत पदवी संपादन केली. उच्च शिक्षण घेऊन देशसेवा करण्याचे सुयोग पाटील यांचे स्वप्न होते. डीआरडीओ, इस्रो, बार्क, एनएचएआय, आयएएफ आणि एनआयसी या संस्थांविषयी त्यांच्या मनात विशेष आकर्षण होते. याच ध्येयाने त्यांनी २०२४ मध्ये ‘गेट’ परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र अपेक्षित गुण मिळाले नाहीत. तरीही खचून न जाता त्यांनी पुन्हा जोमाने अभ्यास सुरू ठेवला. याच काळात त्यांना पंजाब अँड सिंध बँकेत व्यवस्थापक पदाची संधी मिळाली. नोकरी सांभाळत त्यांनी अभ्यासही सुरू ठेवला. अखेर फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या ‘गेट’ परीक्षेत सुयोग पाटील यांनी देशभरातील १ लाख ७० हजार विद्यार्थ्यांमधून ४६० वा क्रमांक मिळविला. जून २०२५ मध्ये डीआरडीओने याच परीक्षेच्या आधारे शास्त्रज्ञ (क्लास १ अधिकारी) पदासाठी भरती जाहीर केली होती. सुयोग पाटील यांनी अर्ज दाखल केला आणि मुलाखतीसाठी त्यांना बोलावण्यात आले. ३० जागांसाठी संगणक विज्ञान शाखेत देशभरातून सुमारे ३५० उमेदवार सहभागी झाले होते. त्यातून सुयोग पाटील यांची निवड झाली. जुलै २०२६ मध्ये ते या पदावर रुजू होणार आहेत. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील या महत्त्वाच्या पदावर निवड झाल्याबद्दल नातेवाईकांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. एल. ए. पाटील यांनी डीआरडीओमधील शास्त्रज्ञ पदाच्या निवडीबाबत सविस्तर माहिती दिली.
सुयोग पाटील हे दहीवद येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक हरेश नामदेव पाटील व अमळनेर भूमी अभिलेख कार्यालयातील सुनंदा हरेश पाटील यांचे चिरंजीव आहेत. तसेच जी. एस. हायस्कूलचे सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक सी. एस. पाटील आणि पतंजलीचे जिल्हा महामंत्री ज्योती चंद्रकांत पाटील यांचे जावई आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply