
दहा वर्षांची देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी, तरी राज्य महामार्ग क्रमांक १५ बनला ‘मृत्यूचा सापळा’!
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातून जाणारा राज्य महामार्ग क्रमांक १५ हा सध्या वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. हायब्रीड ॲन्युइटी मॉडेल (हॅम) अंतर्गत या रस्त्याची दहा वर्षे देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी ठेकेदाराकडे असतानाही मान्सूनपूर्व आवश्यक देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात आलेली नाहीत. परिणामी रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहर हद्दीतून जाणारा हा मुख्य धुळे रस्ता पूर्णपणे काँक्रीटीकरणाचा आहे. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक गटार व्यवस्था अनेक ठिकाणी नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचत आहे. ज्या ठिकाणी गटारी आहेत, त्यांचीही पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्यात आलेली नसल्याने त्या तुंबल्या असून सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे.
रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या डेरेदार वृक्षांच्या फांद्या रस्त्यामधील दुभाजकाकडे झुकल्यामुळे वाहनचालकांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे. दुभाजकांची अवस्था अत्यंत खराब झाली असून अनेक ठिकाणी वाहनांच्या धडकेने काँक्रीट दुभाजक तुटले आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी दुभाजकांची उंची कमी झालेली आहे. तसेच रेस्ट हाऊस चौकापासून तिरंगा चौकापर्यंत अनेक ठिकाणी लोखंडी संरक्षक जाळ्या मोडकळीस आल्या आहेत. या तुटलेल्या भागातून शाळकरी विद्यार्थी व नागरिक थेट रस्ता ओलांडत असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.
महामार्गावरील अनेक ठिकाणी, विशेषतः बसस्थानकासमोर, काँक्रीटचा थर उखडून खडी बाहेर आली असून त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या साईड पट्ट्या खचल्या असून वाहन रस्त्याच्या कडेला गेल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. रस्त्यावरील पांढरे व पिवळे मार्गदर्शक पट्टे पूर्णपणे पुसले गेल्याने विशेषतः रात्री वाहनचालकांना लेनचा अंदाज येत नाही. अनेक ठिकाणी रिफ्लेक्टर नसल्याने अंधारात रस्त्याचा अंदाज बांधणे कठीण होत आहे.
याशिवाय सूचना फलक, वेगमर्यादा फलक, धोकादायक वळणांचे इशारे तसेच शहरातील विविध रस्त्यांच्या दिशादर्शक फलकांचा अभाव असल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुभाजकांमध्ये वाढलेल्या काटेरी झाडाझुडपांमुळे वाहनधारकांच्या दृष्टीस अडथळा निर्माण होत असून वाहतुकीच्या सुरक्षिततेवरही परिणाम होत आहे. पूर्वी हा रस्ता अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत होता. मात्र, सुमारे सहा वर्षांपूर्वी राज्य शासनाच्या हायब्रीड ॲन्युइटी मॉडेल (हॅम) अंतर्गत हा रस्ता धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील जबाबदारी झटकली, तर धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही आवश्यक देखरेख व नियंत्रण होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या मे. बी. आर. भदाणे, धुळे या ठेकेदाराकडूनही मान्सूनपूर्व दुरुस्ती, गटार सफाई, दुभाजक दुरुस्ती, झाडांच्या फांद्यांची छाटणी, मार्गदर्शक पट्ट्यांचे रंगकाम, रिफ्लेक्टर बसविणे, सूचना व दिशादर्शक फलक उभारणे तसेच झाडाझुडपांचे निर्मूलन करण्यात आले नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून येत आहे. प्रशासकीय उदासीनता, ठेकेदाराची निष्क्रियता आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे शहरातील सर्वाधिक वर्दळीचा हा राज्य महामार्ग दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर झाली असून दररोज हजारो वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दहा वर्षांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदाराकडे असतानाही रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस खालावत आहे.
संबंधित विभागांकडून जबाबदारी झटकण्याचा प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक १५ ला नेमका वाली कोण? असा सवाल अमळनेरकरांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदारावर तातडीने कारवाई करून रस्त्यावरील सर्व त्रुटी दूर कराव्यात, रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, गटारांची साफसफाई, साईड पट्ट्यांचे मजबुतीकरण, दुभाजकांची दुरुस्ती, मार्गदर्शक पट्ट्यांचे रंगकाम, रिफ्लेक्टर बसविणे, सूचना व दिशादर्शक फलक उभारणे तसेच झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी, अशी जोरदार मागणी अमळनेरकरांकडून होत आहे.
धुळे कार्यालयाशी केला पत्रव्यवहार
शहरातून जाणारा राज्य महामार्ग क्रमांक १५ हा धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली असल्याने ठेकेदाराकडून देखभाल दुरुस्ती करून घेण्याची जबाबदारी देखील संबंधित विभागाची आहे. रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी धुळे कार्यालयाशी पत्रव्यवहार केला जाईल.
– शैलेश शिंदे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमळनेर
दुरुस्तीची कामे संबंधित ठेकेदाराकडून करून घेण्यात येतील
राज्य महामार्ग क्रमांक १५ हा हायब्रीड ॲन्युइटी मॉडेल (हॅम) अंतर्गत आमच्या विभागाच्या अधिपत्याखाली आहे. रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असून विभागाकडून त्यावर देखरेख केली जाते. रस्त्यावरील त्रुटींबाबत प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या दुरुस्तीची कामे संबंधित ठेकेदाराकडून करून घेण्यात येतील. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील गटारी, दुभाजक, साईड पट्ट्या, मार्गदर्शक पट्टे, रिफ्लेक्टर व आवश्यक सूचना फलकांचीही पाहणी करून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या जातील.
-आर. आर. पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे

Leave a Reply