पिंपळे-मंगरूळ शिवारात बिबट्याची दहशत; झाडावरून उडी मारताच कापूस वेचणाऱ्या मजुरांची उडाली धावपळ

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून विविध भागांत बिबट्याच्या दर्शनाच्या घटना समोर येत असतानाच पिंपळे-शिरसाळे रस्त्यालगत कापूस वेचणी करणाऱ्या मजुरांसमोर अवघ्या २० फुटांवर बिबट्याने झाडावरून उडी मारल्याने एकच धावपळ उडाली. महिला मजुरांसह सर्वांनी आरडाओरड करत शेताबाहेर धाव घेतली आणि रस्त्यावर सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. गेल्या तीन दिवसांत शिरूड, मंगरूळ आणि पिंपळे परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकरी, महिला व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  सकाळच्या सुमारास पिंपळे-शिरसाळे रस्त्यालगतच्या शेतात मजूर कापूस वेचणीचे काम करीत होते. काही मजुरांनी निंबाच्या झाडाखाली डबे ठेवले होते, तर इतर मजूर कापूस वेचत होते. त्याचवेळी जवळच्या झाडावरून अचानक बिबट्याने उडी मारल्याचे मजुरांच्या निदर्शनास आले. बिबट्या अचानक जवळ आल्याने हिरकणबाई दिलीप पाटील, मूलचंद भावडू पाटील यांच्यासह इतर महिला व मजुरांची घाबरगुंडी उडाली. सर्वांनी काम सोडून शेताबाहेर धाव घेतली. मजुरांच्या आरडाओरडीनंतर बिबट्यानेही तेथून पळ काढला. त्यानंतर गावकरी घटनास्थळी पोहोचले असता मजूर मोठ्या प्रमाणात घाबरलेले होते. यापूर्वी २२ सप्टेंबर रोजी मंगरूळ येथे फापोरे रस्त्यावर कैलास केशव पाटील यांच्या शेतात कलाबाई अंबर पवार आणि इतर महिला शेतात काम करीत असताना अवघ्या ५० फुटांवर बिबट्याने झाडावरून उडी मारली होती. बिबट्याला पाहताच महिलांनी आरडाओरड केली. त्यानंतर बिबट्या तेथून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच वनपाल गुलाब पिंजारी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळतात का, याची पाहणी केली.

 

अनेक भागांत दर्शन; एक बिबट्या की दोन?

 

नंदगाव शिवार, सानेनगर, गांधली रस्ता, गांधली-देवळी-गडखांब शिवार, ताडेपुरा भाग, ढेकू रस्ता, मंगरूळ, शिरूड आणि पिंपळे-शिरसाळे शिवारात बिबट्या दिसल्याच्या घटना समोर आल्याने तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तालुक्याच्या वेगवेगळ्या दिशांना बिबट्याचे दर्शन होत असल्याने नेमका एकच बिबट्या आहे की दोन बिबटे आहेत, याबाबतही नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

वन विभागाने नंदगाव शिवारात तसेच ताडेपुरा आश्रमशाळेजवळ पिंजरे लावले आहेत. बिबट्याची पदचिन्हे आढळल्यास त्या ठिकाणी त्याचे वास्तव्य गृहीत धरून पिंजरे तसेच ट्रॅप कॅमेरे लावण्याची कार्यवाही केली जाते. दरम्यान, बिबट्याचे असल्याचे सांगत काही छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. त्यातील काही छायाचित्रे बाहेरील परिसरातील असल्याचे स्पष्ट झाले होते, तर काही छायाचित्रे खरी असल्याचेही सांगण्यात आले.

 

माहिती मिळताच वन विभागाची पाहणी

 

पिंपळे येथील घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, दिनेश पाटील आणि शुभम पाटील यांनी पत्रकार संजय पाटील यांच्याशी संपर्क साधून वन विभागापर्यंत पोहोचवली. त्यानंतर वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून बिबट्याच्या हालचालींचा माग घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, जमिनीमध्ये ओलावा नसल्याने बिबट्याच्या पायांचे ठसे स्पष्टपणे आढळले नसल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.

 

वन विभागाची जनजागृती; नागरिकांना खबरदारीचे आवाहन

 

घटनेच्या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या वतीने गावात नागरिक व शेतमजुरांसाठी जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी छत्रपती चव्हाण, वनपाल गुलाब पिंजारी, वनरक्षक दुर्गादास वानखेडे, वनरक्षक योगेश पाटील तसेच कर्मचारी प्रविण पाटील, मयुर पाटील आणि समाधान पाटील यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले.

शेतात शक्यतो एकट्याने न जाता समूहाने काम करावे, लहान मुलांना एकट्याने शेतात नेऊ नये, बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाऊ नये, पाठलाग करू नये किंवा त्याला घेरण्याचा प्रयत्न करू नये, अशा सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या. केळी, ऊस यांसारख्या दाट पिकांमध्ये बिबट्याला लपण्यासाठी आसरा मिळू शकतो. त्यामुळे अशा शेतांमध्ये काम करताना विशेष खबरदारी घ्यावी, असेही सांगण्यात आले. बिबट्याची हालचाल आढळल्यास सुरक्षित अंतर ठेवून तातडीने वन विभागाला माहिती द्यावी आणि अफवांवर विश्वास न ठेवता सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले.

 

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचीही चिंता

 

पिंपळे येथे आदिवासी आश्रमशाळा असून ती शेत परिसरात आहे. तेथील मुले अनेकदा बाहेर शौचास जात असल्याने बिबट्याच्या वावराच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे आश्रमशाळा परिसरातही विशेष खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

 

शेतात जाण्याची भीती; गस्त वाढविण्याची मागणी

 

कापूस वेचणीचा हंगाम सुरू असल्याने महिला आणि शेतमजुरांना दररोज शेतात जावे लागत आहे. मात्र, बिबट्याच्या अचानक दर्शनामुळे शेतात जाण्याबाबतच मजुरांमध्ये भीती निर्माण झाली आहे. विशेषतः सकाळच्या वेळी शेताकडे जाणाऱ्या महिला व मजुरांमध्ये चिंता वाढली आहे. त्यामुळे वन विभागाने संबंधित परिसरात गस्त वाढवून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि शेतकरी व शेतमजुरांमधील भीती दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, बिबट्याच्या वाढत्या वावराची दखल खासदार स्मिता वाघ आणि आमदार अनिल पाटील यांनी घेतली असून, शेतकरी व शेतमजुरांमधील भीती दूर करण्यासाठी बिबट्याला पकडण्यासह आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना वन विभागाला दिल्याचे सांगण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *