
सरसकट शेतकरी कर्जमाफीची मागणी; अमळनेर तालुका काँग्रेसचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
अमळनेर (प्रतिनिधी) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना (२०२६) मधील जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, या मागणीसाठी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी (दि. २२) प्रांताधिकारी मयूरजी भंगाळे यांना निवेदन देण्यात आले.
प्रांताधिकारी कार्यालयात तालुका काँग्रेस अध्यक्ष बी. के. सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या कर्जमुक्ती निर्णयातील विविध मुद्द्यांकडे लक्ष वेधले. निवेदनात नमूद करण्यात आले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक काळात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, २ जून २०२६ रोजी जाहीर झालेल्या कर्जमुक्ती शासन निर्णयात अनेक अटी व शर्ती घालण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या निवेदनानुसार, योजनेत केवळ दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची माफी देण्यात आली असून २०१९ मधील महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना फक्त ५० हजार रुपयांपर्यंतच कर्जमाफी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत उर्वरित रक्कम भरण्याची अट घालण्यात आली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. याशिवाय २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांचे कर्ज वेळेत फेडल्यासच ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार असून, मागील कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार नाही. आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, केंद्र व राज्य शासन कर्मचारी, आयकरदाते तसेच सहकार क्षेत्रातील पदाधिकारी व कर्मचारी यांनाही योजनेतून वगळण्यात आल्याबद्दल काँग्रेसने आक्षेप नोंदविला. तालुका काँग्रेसने शासनाकडे सरसकट कर्जमाफी लागू करणे, २०१९ च्या कर्जमाफी लाभार्थी शेतकऱ्यांनाही नव्या योजनेत समाविष्ट करणे, अतिरिक्त रक्कम भरण्याची अट रद्द करणे, प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम वाढविणे, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देणे, सहकार क्षेत्रातील कर्मचारी व पदाधिकाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देणे तसेच शेतीमालाला हमीभाव मिळेपर्यंत हमीभाव व बाजारभावातील तफावत शेतकऱ्यांना देण्याची मागणी केली. यावेळी तालुका अध्यक्ष भागवत सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस मनोज पाटील, जिल्हा महिला अध्यक्ष सुलोचना वाघ, जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे, जिल्हा एनएसयूआय अध्यक्ष ॲड. कौस्तुभ पाटील, ॲड. रज्जाक शेख, सेवादल तालुका अध्यक्ष बन्सीलाल भागवत, एससी-एसटी तालुका अध्यक्ष भगवान संधान शिव, विधानसभा अध्यक्ष हर्षल जाधव, तालुका उपाध्यक्ष पी. वाय. पाटील, तालुका उपाध्यक्ष रामकृष्ण पाटील, डॉक्टर सेल तालुका अध्यक्ष डॉ. रवींद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष दिलीप पाटील, तालुका सरचिटणीस सुधाकर भैसे, जिल्हा सरचिटणीस मगन पाटील, तालुका उपाध्यक्ष कैलास पाटील, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष राजू भाट, डॉ. प्रकाश पाटील, शालिग्राम पाटील, पितांबर पाटील, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष तुषार संदांशिव, संदीप बारी, उमेश संधान शिव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply