
ओसाड शिवटेकडीवर ८ ऑगस्टला १००८ रोपांचे महावृक्षारोपण; ५० हजार वृक्षांचे ‘हरित स्वप्न’
अमळनेर (प्रतिनिधी) हजारो वर्षांचा इतिहास, धार्मिक श्रद्धा आणि निसर्गसौंदर्याची साक्ष देणाऱ्या धार येथील शिवटेकडीला पुन्हा हिरवाईने नटविण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प हाती घेण्यात आला आहे. या हरित पुनरुज्जीवनाच्या पहिल्या मोठ्या टप्प्यात शनिवार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी शिवटेकडी परिसरात तब्बल १००८ रोपांचे भव्य महावृक्षारोपण करण्यात येणार आहे.
या उपक्रमानिमित्त दुपारी ३ वाजता धार येथील महादेव मंदिरापासून भव्य ‘वृक्षदिंडी’ काढण्यात येणार असून, सायंकाळी ५ वाजता शिवटेकडीवर सामूहिक वृक्षारोपणाला सुरुवात होणार आहे. पर्यावरण संवर्धन, धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक सहभाग यांचा अनोखा संगम या उपक्रमातून साधला जाणार आहे.
शिवटेकडीला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असून, अनेक वर्षांपासून टेकडीवर जाण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर पायपीट करावी लागत होती. या परिसराचा विकास व्हावा, शिवटेकडीपर्यंत पोहोचणे सुलभ व्हावे आणि त्याचबरोबर टेकडीचे पर्यावरणीय संवर्धन व पुनरुज्जीवन व्हावे, या उद्देशाने धार येथील ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी आणि विविध सेवाभावी घटक एकत्र आले.nसंदीपकुमार साळुंखे (आयकर आयुक्त, नागपूर) आणि विजय भदाणे (सेवानिवृत्त बांधकाम विभाग अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमासंदर्भात पहिली ऑनलाइन बैठक घेण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थ आणि सहकाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांतून अवघ्या एका महिन्यात शिवटेकडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम मार्गी लागले.
१८ एप्रिल २०२६ हा शिवटेकडीच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस ठरला. या दिवशी टेकडीपर्यंत दुचाकी, चारचाकी तसेच ट्रॅक्टर पोहोचू शकेल, असा रस्ता पूर्ण स्वरूपात उपलब्ध झाला. त्यामुळे शिवटेकडीच्या पुढील विकासासोबतच वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाच्या कामाला मोठी चालना मिळाली. “आपल्या हातून एक रोप… पुढील पिढीसाठी एक हिरवा वारसा!” या संकल्पनेतून शिवटेकडीच्या हरित पुनरुज्जीवनाला सुरुवात होणार आहे.
कार्यक्रमाला येणाऱ्या नागरिकांनी दुपारी ३ वाजताची वेळ पाळून महादेव मंदिर येथे वृक्षदिंडीसाठी उपस्थित राहावे, असे विशेष आवाहन मारवड व परिसर विकास मंच आणि धार–मालपुर विकास मंच यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शेकडो वर्षांची ऐतिहासिक आणि धार्मिक ओळख
जपणाऱ्या शिवटेकडीला आता हजारो वृक्षांची हिरवीगार किनार लाभावी, या उद्देशाने सुरू झालेल्या या उपक्रमातून केवळ टेकडीच नव्हे, तर पुढील पिढ्यांसाठी एक समृद्ध पर्यावरणीय वारसा उभा करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आता शिवटेकडीच्या ‘हरित पुनरुज्जीवनाचा’ श्रीगणेशा
रस्ता तयार झाल्यानंतर आता शिवटेकडीला हिरवाईने नटविण्याचा व्यापक संकल्प करण्यात आला आहे. त्याचाच पहिला टप्पा म्हणून ८ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी १००८ रोपांचे सामूहिक वृक्षारोपण करण्यात येणार आहे. मात्र ही मोहीम केवळ रोपे लावण्यापुरती मर्यादित राहणार नाही. लावलेल्या प्रत्येक रोपाचे नियमित संगोपन, संरक्षण आणि संवर्धन करून त्याचे भविष्यात मोठ्या वृक्षात रूपांतर करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. १००८ रोपांपासून सुरू होणारी ही हरित चळवळ पुढील काळात टप्प्याटप्प्याने विस्तारत शिवटेकडी आणि परिसरात ५० हजार वृक्षांचे हरित क्षेत्र निर्माण करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे.
दुपारी ३ वाजता महादेव मंदिरापासून ‘वृक्षदिंडी’
कार्यक्रमाची सुरुवात शनिवार, ८ ऑगस्ट रोजी दुपारी ठीक ३ वाजता धार येथील महादेव मंदिरापासून होणार आहे. येथून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी भव्य ‘वृक्षदिंडी’ शिवटेकडीच्या दिशेने प्रस्थान करणार आहे.
या वृक्षदिंडीतून “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे”, “एक वृक्ष… एक संकल्प… हजारो जीवांचे रक्षण” यांसह वृक्षसंवर्धनाचे विविध संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. वृक्षदिंडी शिवटेकडीवर पोहोचल्यानंतर सायंकाळी ५ वाजता १००८ रोपांच्या महावृक्षारोपणाला सुरुवात होणार आहे.
प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा
या अभियानात अमळनेर शहर व तालुक्यातील सामाजिक संस्था, धार्मिक संस्था, पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी, शेतकरी, महिला मंडळे, युवक मंडळे, शाळा-महाविद्यालये, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच नागरिकांनी आपल्या परिवारासह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या हातून किमान एक रोप लावून केवळ वृक्षारोपण न करता त्या रोपाच्या संगोपनाची आणि संरक्षणाची जबाबदारीही स्वीकारावी, असा संदेश या अभियानातून देण्यात येणार आहे.

Leave a Reply