
अमळनेरमध्ये ‘जनगणना २०२७’साठी स्व-गणना सुविधा सुरू; नागरिकांना घरबसल्या माहिती नोंदवण्याचे आवाहन
अमळनेर (प्रतिनिधी) भारत सरकारच्या गृह मंत्रालयातर्फे ‘जनगणना २०२७’च्या पहिल्या टप्प्याला लवकरच सुरुवात होत असून, यंदा प्रथमच नागरिकांना घरबसल्या माहिती नोंदवण्यासाठी डिजिटल ‘स्व-गणना’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत ही सुविधा खुली राहणार असून, अमळनेर शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या आधुनिक सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमळनेर नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.
‘आमची जनगणना, आमचा विकास’ या अभियानांतर्गत घरसूची व गृहगणनेचे काम करण्यात येणार आहे. नागरिकांचा वेळ वाचावा आणि माहिती अधिक अचूक संकलित व्हावी, या उद्देशाने ‘स्व-गणना’ प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नागरिकांनी se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वतःच्या मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून एकवेळ संकेतांक (ओटीपी) द्वारे प्रवेश नोंदणी करावी. त्यानंतर आपले राज्य, जिल्हा व अमळनेर शहर निवडून डिजिटल नकाशावर घराचे स्थान निश्चित करावे. कुटुंबाची सर्व माहिती भरल्यानंतर एक ‘एसई आयडी’ तयार होईल. हा एसई आयडी नागरिकांनी जपून ठेवणे आवश्यक आहे. १६ मे ते १४ जून या कालावधीत नगरपरिषदेचे अधिकृत प्रगणक घरोघरी सर्वेक्षणासाठी येतील. त्यावेळी नागरिकांनी फक्त आपला एसई आयडी देणे अपेक्षित आहे. यामुळे प्रत्यक्ष सर्वेक्षणासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
जे नागरिक ऑनलाईन स्व-गणना करू शकणार नाहीत, त्यांच्या घरी प्रगणक प्रत्यक्ष भेट देऊन माहिती संकलित करतील. नागरिकांनी दिलेली सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल व कायद्याने सुरक्षित राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहराच्या पुढील दशकाच्या नियोजनासाठी, शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी व निधी वाटपासाठी जनगणनेची आकडेवारी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे अमळनेरच्या नागरिकांनी ‘मी प्रगती आहे, मी विकास आहे’ या संदेशाला प्रतिसाद देत १ मेपासून सुरू होणाऱ्या स्व-गणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply