
पिळोदा येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा सहा वर्षाच्या बालिकेवर हल्ला
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पिळोदा येथे पिसाळलेल्या कुत्र्याने सहा वर्षाच्या बालिकेला कानाजवळ चावा घेतल्याने बालिका गंभीर जखमी झाली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण ससरले आहे. या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पिळोदा येथे पिसाळलेला कुत्रा दोन तीन जणांना चावल्याने भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे हा कुत्रा लहान मुलांनाच चावत असल्याने पालक चिंताग्रस्त झाले आहेत. मृणाली दिनेश कोळी (वय ६) ही मुलगी गांधली पिळोदा रस्त्यावर असताना पिसाळलेल्या कुत्र्याने झडप घालून तिच्या कानाजवळ लचका तोडला. बालिका गंभीर जखमी होऊन अत्यवस्थ झाली. गावकऱ्यांनी तिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात आणले. प्राथमिक उपचार केल्यानन्तर तिला तातडीने धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. ग्रामपंचायतीने मोकाट गुरे व पिसाळलेल्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Leave a Reply