वृत्तपत्रांच्या जाहिरात दरात १५०% वाढ करण्याची ‘व्हॉईस ऑफ मीडियाची मागणी

संघटनेने प्रांताधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

 

 अमळनेर (प्रतिनिधी) राज्यातील वृत्तपत्र उद्योगाला भेडसावणाऱ्या आर्थिक समस्या आणि पत्रकारांवर होणारे वाढते हल्ले या निषेधार्थ ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. तसेच गेल्या सात वर्षांपासून जाहिरात प्रलंबित असलेली १५०% दरवाढ तातडीने लागू करावी आणि पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

अमळनेर येथील प्रांतधिकारी आणि तहसीलदार यांच्यामार्फत हे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे. यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशसरचिटणीस डॉ. डिगंबर महाले, तालुकाध्यक्ष उमेश काटे, शहराध्यक्ष

जयंत वानखेडे, जिल्हा संघटक जयेशकुमार काटे, राहुल पाटील, संजय पाटील, भाऊसाहेब देशमुख, जगदीश पाटील, बी. एल. पाटील, चंद्रकांत निकुंभ, सुखदेव ठाकूर, दिनेश पालवे, रजनीकांत पाटील, कमलेश वानखेडे, उमाकांत ठाकूर, अजय भामरे व  स्थानिक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, सन २०१९ पासून कागद, शाई, वीज आणि मजुरीच्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, शासनाच्या जाहिरात दरांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. यामुळे राज्यातील विशेषतः लघु आणि मध्यम वृत्तपत्रांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जाहिरात दरात १५०% वाढ करावी, जाहिरात देयके ३० दिवसांच्या आत अदा करावीत आणि ई-टेंडर जाहिराती पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध कराव्यात, अशा मुख्य मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्यात पत्रकारांवर होणारे हल्ले आणि त्यांच्यावर सूडबुद्धीने केल्या जाणाऱ्या कारवायांबाबत संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच अकोल्यातील पत्रकारांवर दाखल केलेला हक्कभंग आणि कारावासाची शिक्षा,नांदेडमध्ये महिला पत्रकारावर झालेली कारवाई,.अर्धापूर येथे पत्रकार मनोज मन्नपूर्वे यांच्या अपहरणाचा झालेला प्रयत्न व चिपळूण आणि श्रीरामपूर येथील पत्रकारांवरील हल्ले व धमक्या या सर्व घटना लोकशाहीसाठी घातक असून, पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये या मागण्यांसाठी लाक्षणिक आंदोलने सुरू आहेत. शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने राज्यभर अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

 

“वृत्तपत्र उद्योग हा लोकशाहीचा कणा आहे. जर हा कणाच आर्थिकदृष्ट्या मोडला, तर सामान्य जनतेचा आवाज दाबला जाईल. शासनाने आमच्या न्याय्य मागण्यांचा तात्काळ विचार करावा.नाहीतर आंदोलन  करण्यात येईल

डॉ. डिगंबर महाले, प्रदेशसरचिटणीस, व्हॉईस ऑफ मीडिया,अमळनेर

 

पत्रकाराच्या कुटुंबाला 25 हजाराची मदत

 

अमळनेर येथील पत्रकार तथा व्हॉइस ऑफ मीडियाचे सदस्य मधुसूदन वसावे यांच्या पत्नी मल्टी डिसिज मुळे मुंबई येथील हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती प्रबळ नसल्याने अडचणी येत होत्या. यावर तात्काळ मदत म्हणून व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस डॉ दिगंबर महाले यांनी अमळनेर टीम कडून 25 हजार रुपयांची मदत देण्यात आली. उर्वरित उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधी साठी संघटनेकडून पाठपुरावा केला जाणार असल्याचे डॉ महाले यांनी आश्वासित केले. याप्रसंगी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

 

मयत पत्रकाराच्या कुटुंबाला धीर

 

अमळनेर येथील पत्रकार तथा व्हॉइस ऑफ मीडियाचे सदस्य योगेश महाजन यांचे अकाली निधन झाले. या पार्श्वभूमीवर द्वार दर्शन करण्यात आले. यावेळी मयत योगेश महाजन यांच्या पत्नी,  मुले व वृद्ध आई वडिलांचे सांत्वन केले. मुलांचे शिक्षण,सर्व कुटुंबाला मानसिक आधारासोबतच सर्वतोपरि सहकार्य केले जाणार असल्याचे व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.  डिगंबर महाले यांनी आश्वासित केले. याप्रसंगी पदाधिकरी व सदस्य उपस्थित होते.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *