गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमळनेरात आज शांतता समितीची बैठक

अमळनेर (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा, यासाठी अमळनेर पोलीस प्रशासनातर्फे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक आज, दि. १ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता वाणी मंगल कार्यालय, पवन चौक, अमळनेर येथे होणार आहे.

या बैठकीस जळगावचे पोलीस अधीक्षक आणि चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक उपस्थित राहणार आहेत. तसेच विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारीही बैठकीला उपस्थित राहणार आहेत. गणेशोत्सव काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था, मिरवणुकीचे नियोजन, सार्वजनिक शांतता तसेच विविध गणेश मंडळांच्या समस्या आणि प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजनांबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या काळात नागरिक मोठ्या संख्येने सार्वजनिक ठिकाणी एकत्र येतात. गणेश मंडळांकडून विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि सर्व समाजघटकांमध्ये सलोखा कायम राहावा, यासाठी पोलीस प्रशासनाकडून शांतता समितीच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. या बैठकीस शहरातील सर्व शांतता समिती सदस्य, गणेश मंडळांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, मोहल्ला समिती सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य, पोलीस पाटील तसेच पत्रकारांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *