
कॉपी पुरविण्यास नकार दिल्याने होमगार्डवर लोखंडी रॉडने केला हल्ला
अमळनेर (प्रतिनिधी) परीक्षेदरम्यान कॉपी पुरविण्यास मदत करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून दोन जणांनी एका होमगार्डवर लोखंडी रॉडने हल्ला करून जखमी केल्याची घटना १४ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भारत गॅस गोडाऊनजवळ घडली. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, डी. डी. नगर येथील भूषण पाटील याचा भाऊ पियुष पाटील याची परीक्षा एन. टी. मुंदडा माध्यमिक विद्यालयात सुरू होती. त्याला कॉपी पुरविण्यासाठी शाळेत जाण्यास मदत करावी, अशी विनंती अनिकेत राजेंद्र पाटील (रा. डी. डी. नगर) याने होमगार्ड राकेश पुरुषोत्तम चौधरी यांच्याकडे केली. मात्र, होमगार्डने ही बेकायदेशीर मदत करण्यास स्पष्ट नकार दिला.
यामुळे संतप्त झालेल्या अनिकेत पाटील याने राकेश चौधरी यांना शिवीगाळ करत खाली पाडले, तर भूषण पाटील याने त्यांना पकडून ठेवले. त्यानंतर अनिकेतने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पुढे लोखंडी रॉडने डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, चौधरी यांनी वार चुकविल्याने तो त्यांच्या चेहऱ्यावर बसून ते जखमी झाले. घटनेनंतर जखमी होमगार्डने उपचार घेतल्यानंतर उशिरा अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनिकेत राजेंद्र पाटील व भूषण पाटील यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११७(२), ११५(२), ३५(१)(२) व ३५२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत.

Leave a Reply