गुढीपाडव्याला अमळनेरात शोभायात्रा काढून जल्लोष, नववर्षाच्या स्वागताने शहर दुमदुमले

अमळनेर (प्रतिनिधी) येथील हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडवा निमित्त शोभायात्रा शहरात मोठ्या उत्साहात व जल्लोषात काढण्यात आली. पारंपरिक संस्कृती, धार्मिक वातावरण आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण शहर नववर्षाच्या स्वागताने दुमदुमून गेले.

प्रताप मिल येथील बंसीलाल पॅलेस येथून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी गुढी उभारून तसेच प्रताप शेटजी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात शोभायात्रेला सुरुवात झाली. या शोभायात्रेत गायत्री परिवार, प्रजापती ब्रह्मकुमारी, आर्मी स्कूल, तुकाराम महाराज, स्वामी नारायण, विश्व हिंदू परिषद, भगवान महावीर, अग्रेसन महाराज, प्रताप महाविद्यालय, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, फार्मसी स्कूल, क्षेत्रीय माळी समाज, गाडगेबाबा तसेच श्री गजानन महाराज मंदिर आदी विविध संस्था व मंडळांच्या आकर्षक रथ-झांक्यांनी विशेष लक्ष वेधून घेतले. “जय श्रीराम” व “भारत माता की जय” अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या तरुण-तरुणींचा उत्साह यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरला. विविध सामाजिक व धार्मिक विषयांवरील झांक्यांनी नागरिकांचे मन जिंकले.

शोभायात्रा प्रताप मिल, स्टेशन रोड, स्वामी नारायण मंदिर, सुभाष चौक, राणी लक्ष्मीबाई चौक, दगडी दरवाजा, सराफ बाजार, वाडी चौक, माळी वाडा, झामी चौक पोलीस चौकी, राजहंस चौक, पवन चौक, तिरंगा चौक, पाचपावली देवी मंदिर, कोंबडी बाजार, विजय शॉपी, पोस्ट ऑफिस, बजरंग सुपर मार्केट मार्गे मार्गक्रमण करत श्री संकटमोचन हनुमान मंदिर येथे समारोप करण्यात आला.

मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी पाणी, शरबत व नाश्त्याची व्यवस्था केली होती. अनेकांनी घरासमोर रांगोळ्या काढून व गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले. समारोपस्थळी मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. बजरंगशेठ अग्रवाल, डी. डी. पाटील व नीरज अग्रवाल यांनी सहभागी नागरिकांचे आभार मानले. आयोजकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने सहभाग नोंदविल्याने संपूर्ण कार्यक्रम दिमाखात पार पडला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *