यशासाठी मैदानी चाचणी सोबत लेखी परीक्षेचा सराव महत्त्वाचा : पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम

अमळनेर (प्रतिनिधी) मैदानी चाचणी जेवढी महत्त्वाची तेवढाच लेखी परीक्षेचा सरावही खूप महत्त्वाचा असतो. दोन्ही परीक्षेत संतुलन साधता आलं की यश संपादन करता येते, असे प्रतिनिधी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले.

अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र अमळनेर, पातोंडा परिसर विकास मंच आणि राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पोलीस भरती मोफत टेस्ट सिरीज व मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अमळनेरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम उपस्थित होते. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निकम म्हणाले की, विद्यार्थ्यांनी सकाळ संध्याकाळ मैदानी चाचणीची तयारी नियमित करावी. आपण कोणत्या विषयात मागे आहोत, त्यानुसार अभ्यासाचे देखील नियोजन करावे. मागील परीक्षांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासाव्यात त्यानुसार आपल्याला परीक्षेचा अंदाज बांधता येतो. ग्रामीण भागातील विद्यार्थी काटक असतात मैदानी चाचणीत चांगले गुण मिळवतात. परंतु लेखी परीक्षेत मागे पडतात, तसे होऊ नये म्हणून लेखी परीक्षेची तयारी उत्तम प्रकारे करावी. पोलीस भरती जवळ आली की नियमित व्यायाम करावा व सकस आहार घ्यावा. आपले आरोग्य उत्तम राखावे अशा टिप्स पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी विद्यार्थ्यांना दिल्या. त्याचबरोबर त्यांनी प्रेरणादायी उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. यावेळी नाशिक येथील आदिवासी विकास विभागाचे सहआयुक्त  कपिल पवार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी टेस्ट सिरीज मध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्र संचालक विजयसिंह पवार यांनी केले. जिजाऊ अभ्यासिकाचे संचालक विशाल घिसाडी यांनी सहकार्य केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *