आषाढी एकादशीनिमित्त उधना–मिरज विशेष रेल्वे; अमळनेरला दोन दिवस थांबा, वारकऱ्यांना मोठा दिलासा

अमळनेर (प्रतिनिधी) आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने उधना–मिरज–उधना विशेष रेल्वे (क्रमांक ०९०७१/०९०७२) चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष रेल्वे प्रत्येकी दोन फेऱ्या करणार असून अमळनेर रेल्वे स्थानकावरही तिचा थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे खान्देशातील वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्यास मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

याबाबत रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ०९०७१ उधना–मिरज विशेष ही गाडी २३ व २४ जुलै २०२६ रोजी उधना येथून सकाळी ६.४५ वाजता सुटेल. ही गाडी अमळनेर रेल्वे स्थानकावर सकाळी ११.३० वाजता येईल व ११.३२ वाजता मिरजकडे रवाना होईल. पुढे ही गाडी पंढरपूर येथे पहाटे ४.०० वाजता पोहोचून मिरज येथे सकाळी ७.३० वाजता दाखल होईल. परतीची ०९०७२ मिरज–उधना विशेष ही गाडी २४ व २५ जुलै २०२६ रोजी मिरजहून सकाळी ८.४० वाजता सुटेल. ही गाडी अमळनेर स्थानकावर रात्री १.११ वाजता येऊन १.१३ वाजता उधनाकडे रवाना होईल. उधना येथे ती सकाळी ७.५० वाजता पोहोचेल. या विशेष रेल्वेत २० जनरल डबे, २ सामान्य डबे आणि २ एसएलआर डबे, असे एकूण २४ डब्यांचा रेक असणार आहे. ही रेल्वे उधना, बारडोली, व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, सिंदखेडा, नरडाणा, अमळनेर, धारणगाव, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड, कुर्डुवाडी, पंढरपूर मार्गे मिरजपर्यंत धावणार आहे. रेल्वे प्रशासनाने सर्व संबंधित स्थानकांवर या विशेष रेल्वेच्या वेळापत्रकाची माहिती फलकावर प्रसिद्ध करण्याचे तसेच नियमित उद्घोषणा करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय प्रवाशांच्या सोयीसाठी आरक्षण, प्रसिद्धी आणि इतर आवश्यक व्यवस्था करण्याच्या सूचनाही संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी ही विशेष रेल्वे मोठा दिलासा ठरणार आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *