स्वच्छ वारी, हरित वारी उपक्रमातून एनएसएसकडून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; वारकऱ्यांमध्ये स्वच्छतेची जनजागृती

अमळनेर (प्रतिनिधी) आषाढी वारीनिमित्त संत सखाराम महाराज यांच्या पालखीने नुकतेच अमळनेर येथील तुळशीबाग परिसरातून पंढरपूरकडे प्रस्थान केले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने ‘स्वच्छ वारी, हरित वारी’ हा जनजागृतीपर उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा प्रभावी संदेश वारकरी व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

या उपक्रमात धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय, प्रताप महाविद्यालय आणि समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तिन्ही महाविद्यालयांतील प्रत्येकी २५ विद्यार्थ्यांनी सहभागी होत तुळशीबाग परिसरात स्वच्छता अभियान राबविले. उपक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी परिसरातील प्लास्टिक व इतर कचरा वेचून स्वच्छता केली. तसेच वारकरी आणि नागरिकांना ‘स्वच्छ वारी, हरित वारी’चा संदेश देत पर्यावरण संरक्षण व स्वच्छतेबाबत जनजागृती केली. यानंतर संत सखाराम महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेता यावे, यासाठी स्वयंसेवकांनी नियोजनपूर्वक सहकार्य केले. यावेळी विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. संदीप नेरकर, धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. लीलाधर पाटील, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. मीनाक्षी इंगोले, प्रताप महाविद्यालयाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सुनील राजपूत, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. वैशाली राठोड, समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. अनिता खेडकर तसेच तिन्ही महाविद्यालयांतील स्वयंसेवक उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रा. डॉ. संदीप नेरकर यांनी सांगितले की, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने ‘स्वच्छ वारी, हरित वारी’ हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून वारकरी, विशेषतः तरुण पिढीमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना दृढ होत असून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्यास या उपक्रमाची महत्त्वपूर्ण मदत होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *