
ॲड. कौस्तुभ सुनील पाटील यांचा एनएसयूआयच्या जिल्हाध्यक्षपदी पदग्रहण सोहळा उत्साहात; संविधान, लोकशाही आणि युवकांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची ग्वाही
अमळनेर (प्रतिनिधी) अखिल भारतीय विद्यार्थी काँग्रेस (एनएसयूआय)च्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी ॲड. कौस्तुभ सुनील पाटील यांची निवड झाल्यानंतर त्यांचा पदग्रहण सोहळा अमळनेर येथील मराठा मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात काँग्रेसच्या राज्य व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून युवकांना संविधान, लोकशाही, सामाजिक न्याय आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस भाऊसाहेब आजबे म्हणाले की, देशातील लोकशाही संस्था, निवडणूक प्रक्रिया, सामाजिक न्याय, शेतकरी, दलित, कामगार आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्ष सातत्याने संघर्ष करत आहे. “अमळनेर ही लढवय्यांची भूमी आहे. स्वातंत्र्य चळवळीत जळगाव जिल्ह्याने महत्त्वाची भूमिका बजावली. अन्यायाविरोधात लढण्याची परंपरा या भूमीत आहे. आजची तरुणाई उद्याचा इतिहास लिहिणारी आहे,” असे सांगत त्यांनी युवकांना परिवर्तनासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते हनुमंतराव पवार, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी (पश्चिम)चे अध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी (पूर्व)चे अध्यक्ष धनंजय शिरीष चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम बापू पाटील, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस संदीप घोरपडे, जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, धनगर पाटील, सुरेश पिरण पाटील, श्वेता पाटील, राजेंद्र भाट, रज्जाक शेख, महेश दगडू पाटील, बन्सीलाल भागवत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप घोरपडे यांनी करताना ॲड. कौस्तुभ सुनील पाटील यांच्या विद्यार्थी चळवळीतील संघर्षमय वाटचालीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षण व्यवस्था, रोजगार, संघटन बांधणी आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर उपस्थित मान्यवरांनी आपली मते मांडली. यावेळी ॲड. कौस्तुभ सुनील पाटील यांना पदभार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हनुमंतराव पवार यांनी शिक्षण क्षेत्रातील पेपरफुटी, बेरोजगारी, कायदा-सुव्यवस्था, वाळू धोरण आणि इतर सार्वजनिक प्रश्नांवर भाष्य करत राज्य सरकारवर टीका केली. पक्षफोडीच्या राजकारणावरही त्यांनी परखड भूमिका मांडली. त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. धनंजय शिरीष चौधरी यांनी युवकांच्या बळावर काँग्रेस अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला. विद्यार्थी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरून लढणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. अविनाश भालेराव यांनी “संघटन विस्तार हाच यशाचा मंत्र” असल्याचे सांगत युवकांनी गावागावांत संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. श्वेता पाटील यांनी एनएसयूआय विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने काम करत असून तळागाळातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका बारी यांनी केले, तर महाजन यांनी आभार मानले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदग्रहण सोहळा युवकांच्या संघटनशक्तीचे आणि काँग्रेसच्या नव्या नेतृत्वावरील विश्वासाचे शक्तिप्रदर्शन ठरला.
गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सन्मान
दहावी, बारावी तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.
“क्रांती तरुणाईच घडवते हा इतिहास आहे” : ॲड. कौस्तुभ सुनील पाटील
सत्काराला उत्तर देताना ॲड. कौस्तुभ सुनील पाटील म्हणाले, “खरी क्रांती काँग्रेसच्या काळात झाली. महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी प्राणांचे बलिदान दिले. संत ज्ञानेश्वरांनी अवघ्या १४ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, तर भगतसिंग यांनी २१ व्या वर्षी देशासाठी बलिदान दिले. भारतीय राज्यघटना समता, समानता आणि स्वातंत्र्य या मूल्यांवर उभी आहे. मात्र आज पुन्हा नव्याने परिवर्तन घडविण्याची गरज आहे आणि त्यासाठी तरुणांनी पुढे यायला हवे. अमळनेर ही साने गुरुजी, प्रताप आणि काँग्रेसच्या समृद्ध परंपरेची भूमी आहे. काही जण काँग्रेसला उतरती कळा लागल्याचे म्हणत असले, तरी नव्या पिढीच्या माध्यमातून पक्षाला पुन्हा बळ मिळेल. संघर्ष करण्याची आमची तयारी आहे आणि ही तरुणाईच परिवर्तन घडवेल.” यावेळी त्यांनी १ जुलैपासून एनएसयूआयच्या माध्यमातून प्रवेश अर्ज, शिष्यवृत्ती अर्ज आणि विविध शैक्षणिक प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य भरून दिल्या जातील, अशी घोषणा केली. तसेच “गाव तेथे एनएसयूआय शाखा” हा उपक्रम राबवून प्रत्येक गावात युवकांचे संघटन उभारले जाईल आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

Leave a Reply