
अमळनेर तालुक्यात मुसळधार पावसाची दमदार हजेरी; शहरात रस्ते जलमय, शेतात पाणी साचल्याने शेतकरी चिंतेत
अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह संपूर्ण अमळनेर तालुक्यात सोमवारी दुपारनंतर मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. सुमारे दोन ते तीन तास कोसळलेल्या धुवाधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले, तर ग्रामीण भागातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नुकत्याच उगवलेल्या पिकांबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
दुपारी सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे अमळनेर शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले. मुख्य बाजारपेठेतील रस्ते, नगरपालिका कार्यालयासमोरील परिसर तसेच इतर अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने तलावसदृश परिस्थिती निर्माण झाली. गटारी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर आले आणि पाण्याचा निचरा न झाल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला.
अनेक ठिकाणी पावसाचे पाणी दुकानांमध्ये शिरल्याने व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. सुमारे तीन तास सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील वाहतूकही मंदावली होती. पाणी साचल्यामुळे काही ठिकाणी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला. दरम्यान, या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, शहरातील अपुरी व निकृष्ट नाली व्यवस्था पुन्हा एकदा उघड झाली असून, प्रत्येक पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा प्रश्न कायम असल्याने नागरिकांकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
ग्रामीण भागातही जोरदार हजेरी
शहरासोबतच तालुक्यातील ग्रामीण भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली. जैतपिरसह अनेक गावांच्या शिवारात शेतांमध्ये पाणी साचले. नुकतीच लागवड झालेल्या कापूस पिकाच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी उभे राहिल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पाणी दीर्घकाळ साचून राहिल्यास कापूस पिकाचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांमध्ये वाढली चिंता
पेरणीनंतर लगेचच झालेल्या या मुसळधार पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा वेळेत न झाल्यास बियाणे कुजण्याची आणि उगवण प्रभावित होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना शेतातील अतिरिक्त पाण्याचा तातडीने निचरा करण्याचा सल्ला दिला आहे.

Leave a Reply