पत्नीच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या पतीला ७ वर्षे सश्रम कारावास; अमळनेर सत्र न्यायालयाचा निकाल

अमळनेर (प्रतिनिधी) पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अमळनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी पतीला ७ वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. भगवान रामदास शिंपी (वय ६०, रा. ताडेपुरा, पैलाड, ता. अमळनेर) असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भगवान शिंपी हे व्यवसायाने टेलरिंगचे काम करत होते. ते रवी टेलर यांच्या दुकानात काम करत होते. दरम्यान, ते नेहमी पत्नी सुरेखा हिला मारहाण करत असल्याने तिने याबाबत रवी टेलर यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावेळी त्यांनी दुसऱ्या दिवशी भगवान यांना समज देण्याचे सांगितले होते. दरम्यान, दि. १ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी सुरेखा शिंपी या मजुरीचे काम करून घरी परतल्या होत्या. त्या घरी असताना पती भगवान शिंपी घरी आले. त्यावेळी त्या मुलगी रोशनी हिच्याशी फोनवर बोलत होत्या. यावरून भगवान शिंपी यांनी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत शिवीगाळ केली आणि तिला मारून टाकण्याची धमकी देत घराबाहेर निघून गेले. यानंतर रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास सुरेखा घरासमोरील ओट्यावर बसलेल्या असताना भगवान शिंपी पुन्हा घरी आले. त्यांनी शिवीगाळ करत सुरेखा यांना चापट-बुक्यांनी मारहाण केली आणि खाली जमिनीवर पाडले. त्यानंतर पॅन्टच्या खिशातून चाकूसारखे धारदार हत्यार काढून त्यांच्या गळ्यावर, मानेवर, हनुवटीवर तसेच दोन्ही हातांवर वार केले. या हल्ल्यात सुरेखा गंभीर जखमी झाल्या. दरम्यान, त्यांचा मुलगा गणेश घरी आला तसेच गल्लीतील नाना चौधरी व इतर नागरिक जमा झाल्याने आरोपी भगवान शिंपी तेथून पळून गेले. जखमी सुरेखा यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी भगवान शिंपी यांच्याविरुद्ध पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे यांनी केला. हा खटला अमळनेर येथील जिल्हा न्यायाधीश क्र. १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी. व्ही. पाटील यांच्या न्यायालयात चालला. या खटल्यात सरकारी वकील अॅड. के. आर. बागुल मंगरूळकर यांनी एकूण सहा साक्षीदार तपासले. यामध्ये फिर्यादी सुरेखा शिंपी यांची साक्ष, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार रवी टेलर व ज्ञानेश्वर संतोष यांची साक्ष तसेच पंच व अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. प्रकाश ताडे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. फिर्यादीवर चाकूने झालेल्या जखमांमुळे आरोपीचा तिला ठार मारण्याचा उद्देश स्पष्ट होत असल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. याबाबत सरकारी वकील के. आर. बागुल यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ अन्वये दोषी ठरवत ७ वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी २ वर्षे कारावास व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्याच्या कामकाजात पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम वाल्डे, पीएस आय उदयसिंग सांळुके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल रणधीर, प्रमोद पाटील, सतीष भोई तसेच भरत इशी यांनी सहकार्य केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *