
तणावमुक्त जीवनशैली स्वीकारून सात्त्विक आहाराला प्राधान्य द्या : हेमंतकुमार भदाणे
अमळनेर (प्रतिनिधी) सध्याच्या धावपळीच्या जीवनात वाढता तणाव आणि बदलती आहारशैली ही आरोग्यासाठी मोठी चिंता बनली आहे. फास्टफूडच्या वाढत्या सेवनामुळे निरोगी जीवनशैली धोक्यात येत असून, तणावमुक्त राहण्यासाठी सकारात्मक विचारसरणी आणि सात्त्विक आहाराचा स्वीकार करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातूनच निरोगी व संतुलित जीवनशैली अंगीकारता येईल, असा सल्ला जळगाव जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंतकुमार भदाणे यांनी दिला.
येथील श्री मंगळग्रह मंदिरात शनिवार, दि. १८ जुलै रोजी आयोजित एकात्मिक बालविकास सेवा योजना (आयसीडीएस) अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते मार्गदर्शन करत होते. या कार्यशाळेला जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील बालविकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ), पर्यवेक्षिका तसेच महिला व बालविकास विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेत हेमंतकुमार भदाणे यांनी तणाव व्यवस्थापन, मानसिक आरोग्य आणि निरोगी जीवनशैली या विषयांवर विविध उदाहरणांच्या माध्यमातून सखोल मार्गदर्शन केले. तणावमुक्त जीवनासाठी नियमित व्यायाम, सकारात्मक विचार, संतुलित दिनचर्या आणि सात्त्विक आहाराचे महत्त्व त्यांनी उपस्थितांना पटवून दिले. यावेळी त्यांनी श्री मंगळग्रह मंदिराचे धार्मिक, सामाजिक आणि ऐतिहासिक महत्त्व विशद केले. तसेच मंदिर आणि मंगळग्रह सेवा संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती देत अशा उपक्रमांचा समाजावर होणारा सकारात्मक परिणाम अधोरेखित केला. मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम यांनी मनोगत व्यक्त करत संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. तसेच श्री मंगळग्रह मंदिरातील धार्मिक परंपरा, पूजाविधी आणि भाविकांसाठी उपलब्ध सुविधा याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमात अमळनेरच्या बालविकास प्रकल्प अधिकारी हेमलताताई पाटील, पर्यवेक्षिका सुजाताताई चौधरी, भाग्यश्रीताई पाटील, प्रीतीताई देवरे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचा हेमंतकुमार भदाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यशाळेस वर्षा भदाणे, पाचोरा येथील बालविकास प्रकल्प अधिकारी संत मॅडम, जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका तसेच महिला व बालविकास विभागातील अधिकारी उपस्थित होते. तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, विश्वस्त डी. एस. सोनवणे, मंगल सेवेकरी आर. टी. पाटील, व्ही. व्ही. कुलकर्णी, नंदू कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगळग्रह सेवा संस्थेचे जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी यांनी केले, तर प्रीतीताई देवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यशाळेत तणावमुक्त जीवनशैली, मानसिक आरोग्य आणि महिला व बालकल्याणाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply