टाळ-मृदुंगाच्या गजरात वाहन मालक-चालक संघटनेची शिस्तबद्ध विसर्जन मिरवणूक

अमळनेर (प्रतिनिधी) वाहन चालक-मालक व श्री छत्रपती शिवबा गणेशोत्सव मंडळ, धुळे रोड, समर्थ नगर, कॉटन मार्केटसमोरर्फे गणरायाची रात्री भक्तिमय वातावरणात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गुलालाला फाटा देऊन फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत गणरायाला भक्तिमय निरोप देण्यात आला.

मंडळाचे अध्यक्ष देविदास महाजन, उपाध्यक्ष धनराज पाटील (फौजी आबा), सुनील पाटील, जय परदेशी तसेच वाहन मालक-चालक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांच्या सहभागाने मिरवणूक उत्साहात पार पडली. सजवलेल्या चारचाकी वाहनातून गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विशेष म्हणजे गुलालाची उधळण टाळून फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. त्यामुळे मिरवणुकीला आकर्षक तसेच पर्यावरणपूरक स्वरूप प्राप्त झाले. फुलांच्या पाकळ्यांनी सजलेला गणराय आणि भक्तिमय वातावरणाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. पाठशाळेतील विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात सहभागी होत पारंपरिक पद्धतीने बाप्पाला निरोप दिला. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. वाहन मालक-चालक संघटनेने केलेले नियोजन, शिस्तबद्ध मिरवणूक आणि पारंपरिक वाद्यांचा वापर यामुळे विसर्जन सोहळ्याला वेगळे स्वरूप प्राप्त झाले. गुलालाऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर, विद्यार्थ्यांचा टाळ-मृदुंगाचा सहभाग आणि शिस्तबद्ध आयोजन यामुळे या मिरवणुकीचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *