व्हिडिओ क्लिपच्या नावावर ब्लॅकमेलिंगचे राजकारण थांबवा; आमच्या आमदारांवर कुठलाही डाग नाही”

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारिंचे माजी आमदार शिरीष चौधरींवर जोरदार पलटवार

 

अमळनेर (प्रतिनिधी) आमदार अनिल पाटील यांच्या विरोधात व्हिडिओ क्लिप असल्याचे सांगत ब्लॅकमेलिंगचे धंदे करायचे असतील तर ते नंदुरबारलाच दाखवा, अमळनेरच्या जनतेसमोर अशा अफवा पसरवून राजकारण करू नका, असा जोरदार पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील व शहराध्यक्ष मुक्तार खाटीक यांनी माजी आमदार शिरीष चौधरींवर केला आहे. आमचे आमदार अनिल पाटील हे स्वच्छ प्रतिमेचे व विकासाभिमुख नेतृत्व असून त्यांच्या विरोधात कोणताही डाग नसल्याचे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले आहे.

माजी आमदारांनी अलीकडे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांना उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे अनेक मुद्द्यांवर खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, माजी आमदारांनी स्वतःच्या पत्रकार परिषदेत सांगितले की संबंधित व्हिडिओ क्लिप त्यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिली होती. जर अशी गंभीर क्लिप दिली असेल तर त्यावर कोणतीही कारवाई का झाली नाही? बडतर्फी तर दूरच, उलट मंत्रीपद कसे मिळाले, याचा खुलासा माजी आमदारांनी करावा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच, खरोखरच अशी क्लिप त्यांच्या ताब्यात असती तर ती थेट जनतेसमोर आणली असती. अजितदादांकडे देऊन बसण्याइतके ते दुधखुळे नाहीत आणि जनता देखील एवढी भोळी नाही, असेही त्यांनी नमूद केले. नंदुरबार येथे घडलेल्या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ अमळनेरमध्ये चर्चेत आला असला तरी तो आम्ही तयार केलेला नसून नंदुरबारमधील लोकांनीच तो सोशल मीडियावर प्रसारित केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या व्हिडिओबद्दल एवढा राग असेल तर त्याचा रोष नंदुरबारकरांवर काढावा, असेही त्यांनी टोला लगावला.

डीपी रस्त्यांच्या कामांबाबत करण्यात आलेल्या आरोपांवरही त्यांनी प्रत्युत्तर दिले. रस्त्यांचे काम उत्कृष्ट दर्जाचे झाले असून त्याबाबत शंका असल्यास विशेष यंत्रणा बोलावून तपासणी करावी. त्याचबरोबर माजी आमदारांच्या कार्यकाळात झालेल्या रस्त्यांचीही तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. आमदार अनिल पाटील कोणत्या रस्त्याच्या कामात भागीदार आहेत, हे सिद्ध करून दाखवावे. उलट तुमच्या काळात कोणाला आणि कशा पद्धतीने कामे देण्यात आली याची संपूर्ण यादी आमच्याकडेही असल्याचा इशारा त्यांनी दिला.

पीक विम्याच्या पैशांबाबत करण्यात आलेल्या आरोपांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, पीक विम्याची रक्कम आमदारांकडे येते असा आरोप करणे अत्यंत बालिश आहे. मदत व पुनर्वसन विभागामार्फत डीबीटी प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ६९२ कोटी रुपये जमा झाले आहेत. अशा परिस्थितीत तथ्यहीन आरोप करणे हे एका माजी आमदारांना शोभणारे नाही, असे त्यांनी म्हटले.

तसेच, एका सन्माननीय विद्यमान आमदारांबद्दल पत्रकार परिषदेत ‘तू-ता’ अशी भाषा वापरणे हा असंस्कृतपणा असून अमळनेरची ही संस्कृती नाही, अशी टीकाही त्यांनी केली. आमदार अनिल पाटील यांना गाव सोडावे लागेल, असे वक्तव्य करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की ते या भूमीचे भूमिपुत्र आहेत. उलट बाहेरून आलेल्यांनाच भविष्यात अमळनेर सोडावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

नगरपालिकेत थोडीफार सत्ता मिळाली आहे, त्याचा काही दिवस आनंद घ्या; परंतु विकासाच्या मुद्द्यावर आमचे आमदार सक्षमपणे काम करत राहतील, असा दावा भागवत पाटील व मुक्तार खाटीक यांनी प्रसिद्धीपत्रकात केला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *