आषाढी एकादशी निमित्त शाळा-महाविद्यालयांत दिंडी, पालखी सोहळ्यांचा भक्तिमय जल्लोष

अमळनेर (प्रतिनिधी) आषाढी एकादशीच्या निमित्ताने अमळनेर शहरासह तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये पालखी सोहळे, दिंडी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विठ्ठल नामाच्या गजरात विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचे दर्शन घडविताना पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक एकात्मतेचे संदेश दिले. विविध ठिकाणी पालखी पूजन, भजन, भारूड, लेझीम, रिंगण आणि फराळाचे आयोजन करण्यात आले.

 

कळमसरे येथे चिमुकल्यांची भक्तिमय दिंडी

 

अमळनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कळमसरे येथे आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा व दिंडीचे आयोजन करण्यात आले. दिंडीत सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी भक्तिगीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. दिंडी ग्रामपंचायत, राम मंदिर, महाराणा प्रताप चौक व दत्त मंदिर मार्गे गावातून काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन व स्वच्छतेबाबत जनजागृती केली. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, पत्रकार, ज्येष्ठ ग्रामस्थ आणि पालक उपस्थित होते. उपसरपंच जितेंद्र राजपूत यांनी विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप केले, तर नथू चौधरी यांनी गोड खाऊ दिला. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी किशोर सिसोदे, केशव बडगुजर, शैला पाटील, भरत जाधव आणि जयश्री बडगुजर यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

रामेश्वर खुर्दमध्ये भक्तीमय आषाढी दिंडी

 

रामेश्वर खुर्द येथील जागृती अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा आणि गावातील भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. अंगणवाडी व शाळेतील चिमुकल्यांनी विठ्ठल-रखुमाईच्या वेशभूषेत सहभागी होत संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले.

दिंडी गावातून जात असताना प्रत्येक घरासमोर आरती करून पालखीचे स्वागत करण्यात आले. भजन, भारूड, लेझीम आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी वातावरण भक्तिमय झाले. शांताराम दादा, भिका आप्पा, प्रल्हाद महाराज आणि दंगल महाराज यांच्या भजनांनी सोहळ्याला रंगत आली. त्यांना आबासाहेब गोकुळ पाटील यांनी विशेष निमंत्रित केले होते.

कार्यक्रमाच्या यशासाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रमिला पाटील, सोजर पाटील, रत्नप्रभा, कुणाल पोतदार, वैशाली, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी मोलाचे सहकार्य केले.

 

शहापूर व बाम्हणे येथे समावेशक बालदिंडी

 

जिल्हा परिषद शाळा, शहापूर आणि बाम्हणे येथे समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत भव्य बालदिंडी व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामान्य विद्यार्थ्यांसह विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेत विठ्ठल नामाचा गजर केला.

विद्यार्थ्यांनी वारकरी, विठ्ठल-रुक्मिणी तसेच विविध संतांची वेशभूषा साकारली. टाळ-मृदुंग, भगव्या पताका, तुळशी वृंदावन, रिंगण, फुगडी आणि भजनांनी दिंडी आकर्षक ठरली.

या प्रसंगी अशोक सोनवणे, किशोर पाटील, संजय पाटील, नंदलाल पाटील, दिपाली बुवा, पूनम साळुंखे, यादवराव परदेशी, छाया पाटील, स्वाती पाटील, जोस्ना पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, ग्रामस्थ आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली.

 

पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विठूनामाचा गजर

 

पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. शाळेचा परिसर आकर्षक रांगोळ्या, फुलांची सजावट आणि कमानींनी सुशोभित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, संत जनाबाई तसेच विठ्ठलाच्या वेशभूषेत सहभाग घेतला.

विठ्ठल नामाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. रिंगण सोहळा, टाळ-मृदुंग आणि पालखी पूजनाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. पालखी पूजन जे. एस. देवरे, महेश माळी आणि मीनाक्षी बारी यांच्या हस्ते झाले. दक्षा शर्मा हिने विठ्ठलाची भूमिका साकारून उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जे. एस. देवरे, महेश माळी, मीनाक्षी बारी, प्रशांत वंजारी, व्ही. जी. बोरोले, अशोक महाजन, व्ही. एस. अमृतकर, एस. पी. पाटील, सविता पारधी, योगिशा महाजन, अनंत बागल तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 

‘भक्ती रसात न्हाऊन निघाला आषाढी दिंडीचा सोहळा

 

अमळनेर – येथील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी बालवाडी विभागात दि. 24 रोजी “दिंडी सोहळा” उत्साहात साजरा करण्यात आला.

          सुरुवातीस पालखी पूजन करून शाळेपासून पिंपळे रोडवरील मोठेबाबा मंदिरापर्यंत लहानग्या विद्यार्थ्यांची पायी दिंडी काढण्यात आली. या सोहळ्यात विशेष आकर्षण म्हणजे विठ्ठल रुक्मिणी यांच्या वेशभूषेत असणारे विद्यार्थी, युवांश भूषण पवार व  विआना पूजा साहिल यांनी हुबेहूब विठ्ठल रुक्मिणीची भूमिका साकारली. त्याचप्रमाणे इतर विद्यार्थ्यांनी जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत निवृत्तीनाथ महाराज व अजुन इतरही संतांच्या व वारकऱ्यांच्या भूमिका  साकारणाऱ्या चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. आपल्या चिमुकल्यांचे कौतुक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पालकही या सोहळ्यात उपस्थित होतेच पण मोठ्या उत्साहाने व आनंदाने पालकांचे सहकार्य सुद्धा लाभले. गाणी, भजन यासह दिंडी मंदिरात पोहोचली. यानंतर सर्व चिमुकल्यांनी त्यांच्या परीने विठ्ठल नामाच्या जयघोषाने आपल्या परीने दिंडीच्या आनंदात लीन झाले. पालकांनी सुद्धा गाणी, भजन, फुगडी इत्यादी सादर केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, उपाध्यक्ष गुणवंतराव पाटील, सचिव संदीप घोरपडे, सहसचिव ॲड.अशोक बाविस्कर, संचालक किरण पाटील, विलास चौधरी, बालवाडीच्या मुख्याध्यापिका लतिका शिंगाने व सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व शिक्षकांच्या सहकार्याने व अश्विनी लांडगे यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रम उत्साहात पार पडला.

 

विठ्ठल नामाचा गजर’… साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये दिंडी सोहळा उत्साहात संपन्न

 

अमळनेर – येथील साने गुरुजी कन्या हायस्कूल येथे आषाढी एकादशी निमित्ताने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

       कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे सचिव संदीप घोरपडे यांनी विठ्ठल रुक्मिणीचे पूजन केले तर संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, उपाध्यक्ष गुणवंतराव पाटील, सहसचिव ॲड.अशोक बाविस्कर, संचालक किरण पाटील यांनी पालखी पूजन केले. मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे यांनी तुळशीची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात झाली .

       यावेळी प्रत्येक वर्गाने कार्यक्रम सादर केला. त्यात ८अ – अभंग व नृत्य, ८ब – भक्त पुंडलिकाची गोष्ट व नामघोष, ९अ- विठ्ठल नामाची शाळा , ९ब – कीर्तन, १० अ- जगी जीवनाचे सार गीतगायन, १० ब- संपूर्ण वर्गाने गीत गायनासह नृत्य सादर केले.

          प्रास्ताविकात मुख्याध्यापिका श्रीमती बोरसे यांनी संतांची शिकवण सांगताना वारीचे वैशिष्ट्य सांगितले. मनोगतात ॲड.अशोक बाविस्कर यांनी एकादशीचे महत्त्व सांगितले. अध्यक्षीय भाषणात घोरपडे सरांनी वारीची सुरवात कशी झाली हे सांगून, भक्ती म्हणजे माणसांत देव शोधणे व सत्कर्म करणे याबाबत उदाहरणासह समजावून सांगितले. विठ्ठलाचे आरतीने व प्रसाद वाटप करुन दिंडीची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता ९वी अ व ९ वी बच्या विद्यार्थिनी, वर्गशिक्षक आर.एम.देशमुख, सौ.मोनाली वंजारी, श्रीमती धनश्री साळुंखे यांनी व प्रसादाचे शिरा करून देणाऱ्या माता पालकांनी केले होते. जे.एस.पाटील, शैलेंद्र साळुंके, दिपक महाजन, मुकेश पाटील, सौ.मनिषा वैद्य व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन आर.एम.देशमुख तर आभार दिलीप पाटील यांनी मानले.

अमळनेरात महिला पतंजली योग समितीची आषाढी वारी उत्साहात; विठ्ठल नामाच्या गजराने भक्तिमय वातावरण

अमळनेर (प्रतिनिधी): आषाढी एकादशीचे औचित्य साधत अमळनेर महिला पतंजली योग समितीच्या वतीने शनिवारी पहाटे भव्य वारीचे आयोजन करण्यात आले. विठ्ठल नामाच्या अखंड गजरात, टाळ-चिपळ्यांच्या निनादात आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या विविध आकर्षक देखाव्यांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

जिल्हा प्रभारी तथा कोषाध्यक्ष रत्ना भदाणे आणि अमळनेर तहसील प्रभारी कामिनी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या वारीची सुरुवात पहाटे ५.३० वाजता क्रांतिपर्व योगवर्ग, ढेकू रोड येथून झाली. जिजाऊ गेट, बसस्थानक, तिरंगा चौक, सराफ बाजार मार्गे वारी संत सखाराम महाराज वाडीत पोहोचली.

वारीचे प्रमुख आकर्षण म्हणजे शिस्तबद्ध पद्धतीने टाळ-चिपळ्यांच्या गजरात होणारे विठ्ठल नामस्मरण, तुळशी वृंदावन, विठ्ठलाची मूर्ती, भगवा ध्वज, पालखी तसेच विठ्ठल-रखुमाईची वेशभूषा साकारलेल्या भाविकांचा सहभाग. मार्गातील विविध ठिकाणी पारंपरिक रिंगण सोहळे सादर करण्यात आले, ज्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यानंतर सर्व वारकरी भाविकांनी सामूहिकरित्या विठ्ठलाचे दर्शन घेत नदीपात्रात प्रस्थान केले. तेथे विविध योगवर्गांच्या वतीने रिंगण सोहळ्यांचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले. वारीची सांगता रत्ना भदाणे यांच्या हस्ते राजगिऱ्याच्या लाडूंचा प्रसाद वाटप करून करण्यात आली.या वारीच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व योगशिक्षक, योगसंघटन समिती आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. वारीत २० योगवर्गांतील योगशिक्षक व साधकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून वारकरी परंपरेप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. शिस्तबद्ध नियोजन आणि उत्कृष्ट संघटनामुळे ही वारी अमळनेरकरांसाठी भक्ती, संस्कार आणि एकात्मतेचा प्रेरणादायी सोहळा ठरली.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *