जळगाव–दिल्ली विमानसेवा २ मेपासून; खासदार स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश

‘अ‍ॅलियन्स एअर’ची त्रि-साप्ताहिक सेवा; तिकीट दर ३,००० रुपयांपासून

 

अमळनेर (प्रतिनिधी) जळगावकरांसाठी दीर्घ प्रतीक्षेचा शेवट होत असून ‘अ‍ॅलियन्स एअर’ कंपनीची दिल्ली–इंदूर–जळगाव तसेच जळगाव–इंदूर–दिल्ली ही विमानसेवा २ मे २०२६ पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार असल्याची माहिती खासदार स्मिता वाघ यांनी दिली आहे.

जलसंपदा मंत्री  गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या सहकार्याने तसेच खासदार वाघ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि आमदार सुरेश भोळे यांच्या मागणीनंतर ही सेवा सुरू होत आहे. ही विमानसेवा मंगळवार, गुरुवार आणि शनिवार अशा त्रि-साप्ताहिक स्वरूपात चालवली जाणार आहे.

या सेवेमुळे जळगाव येथील प्रवाशांना दिल्लीसह उत्तर भारतातील विविध शहरांशी थेट हवाई संपर्क मिळणार आहे. तिकीट भाडे सुमारे ३,००० रुपयांपासून सुरू होत असल्याने सामान्य प्रवाशांसाठीही ही सेवा परवडणारी ठरणार आहे. सध्या बुकिंग प्रक्रिया सुरू असून प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

खासदार स्मिता वाघ यांनी जळगाव विमानतळावर नियमित विमानसेवा सुरू व्हावी यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून केंद्र सरकार, नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि संबंधित कंपन्यांशी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळून ही प्रायोगिक सेवा मंजूर झाली आहे. या विमानसेवेच्या माध्यमातून जळगावकरांना दिल्ली व इंदूर येथे प्रवास करणे अधिक सोयीचे होणार असून धार्मिक, व्यावसायिक आणि शैक्षणिक प्रवासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. प्रायोगिक कालावधी १ मे ते ३१ मेदरम्यान यशस्वी ठरल्यास ही सेवा नियमित व अधिक विस्तारित करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, जळगाव विमानतळाचे महत्त्व वाढवणारी ही सेवा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची ठरेल, असा विश्वास स्थानिक उद्योगपती व प्रवासी संघटनांनी व्यक्त केला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *