
महावितरणने फांद्या तोडल्या, कचरा रस्त्यावरच; ठेकेदारावर कारवाईचा पत्ता नाही!
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील विद्युत वाहिन्या व खांबांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी महावितरणकडून ठेकेदारामार्फत करण्यात आली. मात्र, छाटणीनंतर निर्माण झालेल्या फांद्या व पालापाचोळा रस्त्यांच्या कडेला टाकून देण्यात आल्याने गेल्या चार-पाच दिवसांपासून शहरातील विविध भागांत कचऱ्याचे ढीग पडले आहेत. महावितरणने ठेकेदार नेमलेला असतानाही हा कचरा उचलण्याची जबाबदारी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांवर पडल्याने पालिकेच्या आरोग्य विभागावर अतिरिक्त भार आला आहे.
विशेष म्हणजे संबंधित ठेकेदारावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
महावितरणकडून देखभाल-दुरुस्तीची कामे साधारणपणे शनिवारी केली जात असल्याची नागरिकांना कल्पना असते. त्यामुळे वाहतूक व नागरिकांची गैरसोय तुलनेने कमी होते. मात्र, यावेळी शनिवारऐवजी मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली. त्यातच छाटणीपूर्वी नगरपरिषदेला कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. छाटलेल्या फांद्या व पालापाचोळा रस्त्याच्या कडेला तसेच नाल्यांलगत टाकून देण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासोबतच अस्वच्छतेचे चित्र निर्माण झाले आहे. वीज वाहिन्यांच्या सुरक्षिततेसाठी झाडांच्या फांद्यांची छाटणी आवश्यक असली तरी छाटणीनंतर निर्माण होणाऱ्या फांद्या, पालापाचोळा व जैविक कचऱ्याची उचल व वाहतूक संबंधित ठेकेदारानेच करणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात हा कचरा पडून राहिल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे हा कचरा नाल्यांमध्ये वाहून गेल्यास पाण्याच्या निचऱ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. या प्रकाराची दखल घेत नगरपरिषदेने महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र देऊन नाराजी व्यक्त केली आहे. यापुढे झाडांची छाटणी अथवा झाडतोड करण्यापूर्वी नगरपरिषदेला लेखी पूर्वसूचना देणे, कामाचे ठिकाण व स्वरूप कळविणे तसेच छाटणीतून निर्माण झालेला कचरा संबंधित पथक अथवा ठेकेदाराने तात्काळ उचलणे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, ठेकेदाराने कचरा उचलला नाही तर त्याच्यावर कारवाई का झाली नाही, कामाची पाहणी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केली का आणि नगरपरिषदेला पूर्वसूचना न देता शनिवारऐवजी मंगळवारी काम करण्याचा निर्णय कोणी घेतला, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. केवळ नगरपरिषदेने पत्र देऊन विषय संपविण्याऐवजी संबंधित ठेकेदारावर कारवाई करणे, रस्त्यावर पडलेला कचरा उचलण्याचा खर्च कोणाकडून वसूल करायचा हे निश्चित करणे आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर पडलेल्या अतिरिक्त कामाची जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. त्यामुळे महावितरणचे वरिष्ठ अधिकारी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित ठेकेदारासह जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करतात की हे प्रकरण कागदोपत्रीच राहते, याकडे अमळनेरकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply