पांझरा नदीत अवैध वाळू उपसा; मारवड पोलिसांनी केला ट्रॅक्टरसह मुद्देमाल जप्त

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळंबु शिवारातील पांझरा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करून चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर मारवड पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टर व ट्रॉलीसह मुद्देमाल जप्त केला असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दिनांक ५ रोजी सकाळी सुमारे ५:३० वाजण्याच्या सुमारास कळंबु शिवारातील पांझरा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करून विना परवानगी चोरटी वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मारवड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. या कारवाईदरम्यान विना क्रमांकाचे एक ट्रॅक्टर व ट्रॉली पोलिसांना मिळून आले. संबंधित ट्रॅक्टरमध्ये नदीपात्रातून काढलेली वाळू भरलेली असल्याचे आढळून आले. पोलिसांनी अंदाजे १ लाख २० हजार रुपये किमतीचे ट्रॅक्टर व ट्रॉली असा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी ट्रॅक्टर चालक करण मंगा भील (वय २२, रा. बेटावद) तसेच दीपक (पूर्ण नाव व गाव माहित नाही) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध वाळू उपसा व वाहतुकीमुळे नदीपात्राचे नुकसान होत असल्याने प्रशासनाने अशा कारवायांवर कडक भूमिका घेतली आहे. याबाबत हेडकॉन्स्टेबल दिनेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेचा पुढील तपास सफौ सुनील पाटील हे करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *