पाणीटंचाईवरील ‘शविआ’चा मोर्चा तूर्तास स्थगित; नगरपालिकेला आठ दिवसांचा दिला अल्टीमेटम

उद्या सोमवारी नगरपरिषदेत दुपारी चार वाजता ‌‘शविआ‌’सोबत चर्चा करणार 

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका शहर विकास आघाडीने (शविआ) सोमवार, दि. २२ जून रोजी काढण्यात येणारा मोर्चा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी पत्राद्वारे मोर्चा स्थगित करण्याची विनंती केल्यानंतर शहर विकास आघाडीच्या गटनेत्या  जयश्रीताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील पाणीटंचाईसह विविध नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहर विकास आघाडीने दि. २२ जून रोजी सकाळी १० वाजता मोर्चाचे आयोजन केले होते. यासंदर्भात शनिवारी पालिका प्रशासनाला पूर्वसूचनेचे पत्र देण्यात आले. त्यानंतर मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेत मोर्चा स्थगित करण्याची विनंती करणारे पत्र जयश्रीताई पाटील यांना पाठविले.

या पत्रावर निर्णय घेण्यासाठी शनिवारी दुपारी ४ वाजता ‘शविआ’च्या सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत मोर्चा तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, जयश्रीताई पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांना सोमवार, दि. २२ जून रोजी दुपारी ४ वाजता पालिकेत चर्चेसाठी उपस्थित राहण्याचे कळविले आहे. सोमवारी होणाऱ्या बैठकीत शहर विकास आघाडीचे सर्व नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी मुख्याधिकारी तसेच विविध विभागप्रमुखांसोबत शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा आणि इतर लोकाभिमुख प्रश्नांवर सविस्तर चर्चा करणार आहेत. या बैठकीत मांडण्यात येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पालिका प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. निर्धारित कालावधीत प्रश्न मार्गी न लागल्यास शहर विकास आघाडीच्या वतीने अधिक आक्रमक व भव्य मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे. शनिवारी झालेल्या बैठकीस बैठकीस जयश्रीताई पाटील यांच्यासह नगरसेवक डॉ. डिगंबर महाले, विजय कहारू पाटील, सचिन पाटील, शोभाबाई गढरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन राजपूत, जितेंद्र ठाकूर, नरेंद्र संदानशीव, विक्रांत पाटील, मुक्तार खाटीक, विजय राजपूत, नसरोद्दीन हाजी, सयाजीराव पाटील, नरेंद्र चौधरी, ॲड. यज्ञेश्वर पाटील, भूषण भदाणे, निलेश महाजन, संजय भिला पाटील, इम्रान खाटीक, गौरव महाजन, दुर्गेश पाटील, सुनील शिंपी, आशाबाई चावरिया, आरिफ मेवाती, तुषार संदानशीव, वेद पाटील आदी उपस्थित होते. तसेच आघाडीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

आमची तूर्तास संयमाची भूमिका

 

“शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी आम्ही तूर्तास संयमाची भूमिका घेतली आहे. मात्र, पालिकेने अमळनेरकरांसह आमच्या सहनशीलतेचा जास्त अंत पाहू नये. अन्यथा मोठा उद्रेक अटळ आहे.”

जयश्रीताई पाटील, गटनेत्या, ‘शविआ’.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *