
अमळनेरकरांच्या नळाला चक्क ४०० टीडीएसचे पाणी; बैठकीत संताप, स्वच्छ पाणीपुरवठ्याची मुख्याधिकाऱ्यांची ग्वाही
नागरी समस्यांवर प्रशासनाला जाब; चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठ्याची मुख्याधिकाऱ्यांची ग्वाही
नगरपालिकेच्या बैठकीत नागरी प्रश्नांचा पाढा; प्रशासनाला धारेवर धरत कारवाईची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील नागरिकांना सध्या तब्बल ४०० टीडीएसचे पाणी पुरवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार नगरपालिकेच्या बैठकीत समोर आला. सभागृहात प्रत्यक्ष पाण्याचा नमुना तपासला असता टीडीएस ४०० आढळल्याने नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. पिण्याच्या पाण्याचा टीडीएस २०० ते २५० पर्यंत असणे अपेक्षित असताना ४०० टीडीएसचे पाणी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ असल्याचा आरोप करत स्वच्छ व निर्जंतुक पाणीपुरवठ्याची जोरदार मागणी करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी लवकरच चार ते पाच दिवसाआड नियमित, स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा करण्याची ग्वाही दिली.
नगरपालिका सभागृहात शहर विकास आघाडीच्या गटनेत्या जयश्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरी समस्यांवर बैठक झाली. यंदाच्या उन्हाळ्यात तांत्रिक अडचणींमुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. नागरिकांना आठ ते बारा दिवसांनी पाणी मिळाल्याने शहर विकास आघाडीने मोर्चाचा इशारा दिला होता. त्यानंतर मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या विनंतीनुसार मोर्चा स्थगित करण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीत नगरसेवक डॉ. दिगंबर महाले यांनी ही बैठक राजकीय आरोप-प्रत्यारोपांसाठी नसून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी असल्याचे स्पष्ट केले. मात्र, पाणीपुरवठा, अशुद्ध पाणी, तुंबलेल्या गटारी, भुयारी गटार, कचरा घंटागाडीतून बेवारस मृतदेहाची वाहतूक, सफाई कर्मचाऱ्यांचे समायोजन आणि ठेकेदारांच्या कामकाजातील त्रुटी यांसह अनेक मुद्द्यांवर नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला. काही प्रश्नांवर अधिकारी निरुत्तर झाल्याचेही पाहायला मिळाले.
बैठकीत विशेषतः शहरातील पिण्याच्या पाण्याचा टीडीएस तपासण्यात आला. पाण्याच्या टाकीतील नमुना सभागृहातच तपासला असता त्याचा टीडीएस तब्बल ४०० असल्याचे आढळले. हे पाणी पिण्यास योग्य आहे का, असा प्रश्न पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील यांना विचारण्यात आला. मात्र, त्यांच्याकडे याचे समाधानकारक उत्तर नव्हते. नागरिकांच्या जीवाशी खेळ न करता स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी सर्व नगरसेवकांनी केली.
बैठकीत कचरा घंटागाडीतून मृतदेह वाहतूक करणाऱ्या घनकचरा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची, त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याची तसेच वर्षानुवर्षे पाण्याच्या टाक्या स्वच्छ न करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी जयश्री पाटील, डॉ. डीगंबर महाले, विक्रांत पाटील, जितेंद्र ठाकूर, भरतकुमार ललवाणी, योगिता कापडणेकर, हाजी नसीरोद्दीन, जुबेदाबी नासिरोद्दीन हाजी, नरेंद्र संदानशिव, मुक्तार खाटीक, सचिन पाटील आणि शोभाबाई गढरे यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. इतर नगरसेवकांनीही आपल्या प्रभागातील नागरी समस्यांचा पाढा वाचला. बैठकीस मुख्याधिकारी गणेश शिंदे, पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील, प्रवीणकुमार बैसाणे, आरोग्य निरीक्षक संतोष माणिक, किरण कंडारे, बांधकाम अभियंता सचिन गवांदे, दिवाबत्ती अभियंता कुणाल महाले, वसुली विभागाचे लौकिक समशेर, वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन आणि सभा लिपिक प्रमोद लटपटे उपस्थित होते. शहर विकास आघाडीतर्फे जयश्री पाटील, डॉ. दिगंबर महाले, योगिता कापडणेकर, जुबेदाबी नासिरोद्दीन हाजी, अफसाना खाटीक, नंदा संदानशिव, शोभाबाई गढरे, विजय पाटील, सचिन पाटील, देवेंद्र कांबळे, भरतकुमार ललवाणी, माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन राजपूत, समाजसेवक जितेंद्र ठाकूर, विक्रांत पाटील, नरेंद्र संदानशिव, मुक्तार खाटीक, नासिरोद्दीन हाजी, विजय राजपूत, सयाजीराव कापडणेकर, भूषण भदाणे, सुनील शिंपी, संजय पुनाजी पाटील, गौरव महाजन आणि शुभम पाटील उपस्थित होते.
दरम्यान, सभागृहातील घड्याळ बंद असल्याची बाब शेतकी संघाचे संचालक संजय पाटील यांनी निदर्शनास आणून दिली.
बैठकीच्या शेवटी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे देत तापी नदीत पुरेसे पाणी उपलब्ध झाल्याने लवकरच शहरात चार ते पाच दिवसाआड नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, तसेच इतर नागरी समस्यांवरही गांभीर्याने कार्यवाही करून प्रशासन कोणतीही कसूर करणार नसल्याची ग्वाही दिली.

Leave a Reply