आगीनंतर अवघ्या काही दिवसांत ‘प्रति पंढरपूर’ मंदिर पुन्हा सजले

अमळनेर (प्रतिनिधी) शॉर्ट सर्किटमुळे भीषण आगीत नुकसान झालेल्या सद्गुरू संत सखाराम महाराज विठ्ठल–रुक्मिणी संस्थानाच्या मंदिराला सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांच्या निस्वार्थ श्रमदानातून नवसंजीवनी मिळाली आहे. रंगरंगोटी, स्वच्छता, तात्पुरते शेड, विद्युत दुरुस्ती आणि सुशोभीकरणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करून आषाढी एकादशीपूर्वी मंदिर पुन्हा भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, १ जुलै रोजी मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणेत शॉर्ट सर्किट झाल्याने अमळनेरच्या ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल–रुक्मिणी मंदिराला भीषण आग लागली होती. या आगीत मंदिराचे लाकडी छत, नक्षीदार खांब आणि शेड पूर्णपणे जळून खाक झाले. अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव आणि शिरपूर येथील अग्निशमन दलाच्या जवानांसह हिंदू-मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती सुरक्षित राहिल्या.

आगीनंतर मंदिरात तब्बल एक ते दीड फूट कोळसा, राख आणि गाळ साचला होता. विद्युत तारा जळाल्या होत्या, तर भिंतींवर धुराचे काळे डाग पडले होते. त्यामुळे काही दिवस मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान, हभप प्रसाद महाराज वारीसाठी पंढरपूरकडे रवाना झाले असल्याने आषाढी एकादशीला मंदिर बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, वारीतूनच प्रसाद महाराजांनी मंदिर दर्शनासाठी पूर्ववत करण्याचे निर्देश दिल्यानंतर अनेक सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते एकत्र आले. प्रसाद माऊली ग्रुप, माऊली मित्र मंडळ (वाडी चौक), दत्त भजनी मंडळ यांच्यासह विनोद महाजन, संजय पाटील, दिलीप पाटील, गणेश महाजन, आबा मिस्त्री, विजय लायटिंगवाला, दिलीप कोळी, अशोक मिस्त्री, पिंटू जाधव, पंकज पाटील, केतन जोशी, मनोज देवकर, मनोज भांडारकर, मनोहर महाजन, उदय देशपांडे, महेश दुसाने, मोईद्दीन मिस्त्री, संजय भांडारकर, नंदकिशोर मराठे, दगडू पाटील, कमलेश महाजन, भाऊ मराठे आणि विलास चौधरी यांनी राजेंद्र भामरे, महेश कोठावदे, दिलीप देशमुख, सुनील देव आणि सखा हरी देव यांच्या मार्गदर्शनाखाली निस्वार्थपणे श्रमदान केले. या कार्यकर्त्यांनी संपूर्ण मंदिर धुवून स्वच्छ केले, सुमारे चार ट्रॅक्टरभर कोळसा व गाळ बाहेर काढला, मंदिराची रंगरंगोटी केली, छतावर तात्पुरते शेड उभारले, विद्युत दुरुस्ती करून नवीन फिटिंग केले तसेच मंदिराचे आकर्षक सुशोभीकरण केले. अवघ्या काही दिवसांत मंदिर पूर्ववत करून भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले.

आषाढी एकादशी आणि द्वादशीच्या निमित्ताने अमळनेरच्या ‘प्रति पंढरपूर’ येथे दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मंदिर पुन्हा दर्शनासाठी खुले झाल्याने भाविकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक बांधिलकीचे हे कार्य सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *