
डॉ. अ. गो. सराफ यांच्या स्मृतींना रविवारी वाहणार आदरांजली
अमळनेर (प्रतिनिधी) : साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेरचे अध्यक्ष माजी प्राचार्य डॉ. अ. गो. सराफ यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी रविवारी, दि. २३ ऑगस्ट रोजी आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. बजरंग पॅलेस, अमळनेर येथे दुपारी ४ वाजता ही सभा होणार असून, डॉ. सराफ यांच्या जीवनमूल्यांसह शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील कार्याचा जागर या माध्यमातून करण्यात येणार आहे.

स्नेह, शिस्त, सचोटी, पर्यावरणप्रेम, प्रामाणिकपणा आणि वक्तशीरपणा अशा अनेक जीवनमूल्ये व संस्कारांनी समृद्ध असलेले डॉ. अ. गो. सराफ हे अमळनेरसह संपूर्ण खान्देशातील शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा अनेकांच्या जीवनावर उमटला असून, त्यांच्या कार्याचा आणि योगदानाचा आढावा आदरांजली सभेत घेतला जाणार आहे. या आदरांजली सभेचे आयोजन अमळनेर परिसरातील सर्व सराफ सरांचे स्नेही, साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, गुजराथी वैष्णव समाज, सिनियर सिटीझन क्लब, सोनार व सराफ असोसिएशन, श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप, राष्ट्र सेवा दल, न्यू प्लॉट परिसर विकास मंच, प्रताप महाविद्यालय प्राध्यापक संघटना, खान्देश शिक्षण मंडळ तसेच अमळनेर परिसरातील सर्व हितचिंतक आणि पत्रकार बांधव आदींच्या वतीने करण्यात आले आहे. डॉ. अ. गो. सराफ यांच्या कार्याचा आणि जीवनातील मूल्यांचा जागर घडविणाऱ्या या सभेला त्यांच्या स्नेही, सहकारी, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply