
ईद मिरवणुकीतील दगडफेकीसह तीन गुन्हे; इम्रान शेख सलीम सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार
अमळनेर (प्रतिनिधी) : शहरातील शाह आलम नगर येथील इम्रान शेख सलीम (वय २७) याला उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांच्या आदेशाने सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. इम्रान शेख सलीम याच्यावर तीन गुन्हे दाखल असून, ईदच्या मिरवणुकीत दगडफेक केल्यासह सामाजिक शांततेचा भंग करणाऱ्या कृत्यांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हेगारांवर करडी नजर ठेवली असून, सणासुदीच्या काळात झालेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि डीवायएसपी विनायक कोते यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या माध्यमातून अमळनेर तालुक्यातील गुन्हेगारांचा आढावा घेतला आहे. आगामी ईद, रक्षाबंधन, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर समाजातील कायदा व सुव्यवस्था बिघडवणारे, दादागिरी व गुंडगिरी करणारे तसेच ज्यांच्यापासून नागरिकांमध्ये दहशत व भीती निर्माण होते, अशा गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत.
शाह आलम नगर येथील इम्रान शेख सलीम याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. त्याने ईदच्या मिरवणुकीत दगडफेक केली होती. तसेच त्याच्या कृत्यांमुळे सामाजिक शांततेचा भंग होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते.
पोलिसांनी इम्रान शेख सलीम याला जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांच्याकडे पाठविला होता. त्यावर सुनावणी घेण्यात आली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून तसेच गोपनीय साक्षीदारांची तपासणी केल्यानंतर प्रांताधिकारी मयुर भंगाळे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ (अ)(ब) अन्वये इम्रान शेख सलीम याला जळगाव जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दि. २१ ऑगस्ट रोजी दिले.
“वारंवार गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई”
“दरम्यान वारंवार गुन्हेगारी कृत्य करणे तसेच अशांतता निर्माण करून कायदा व सुव्यवस्था भंग करून सामान्य जनतेस वेठीस धरणे असे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.”
-विनायक कोते, डीवायएसपी, अमळनेर उपविभाग

Leave a Reply