
अमळनेर-धुळे रस्त्यावर भीषण तिहेरी अपघात; एकाच कुटुंबातील चौघांसह सहा जणांचा जागीच मृत्यू
साखरपुड्यासाठी येत असलेल्या महाजन कुटुंबावर काळाचा घाला; पशुवैद्यकीय अधिकारी व विद्यार्थिनीचाही मृत्यू, एक जखमी

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर-धुळे रस्त्यावर मंगरूळजवळील हॉटेल वृंदावन परिसरात मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण तिहेरी अपघातात एकाच कुटुंबातील चौघांसह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने प्रथम मोटरसायकलला आणि त्यानंतर एसटी बसला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेने अमळनेरसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातील व्यारा येथील रहिवासी तथा मूळ अंबापिंप्री (ता. पारोळा) येथील महाजन कुटुंबीय आपल्या भाच्याचा अमळनेर येथील राजेंद्र एकनाथ महाजन यांच्या मुलीसोबत होणाऱ्या साखरपुड्यासाठी कार (जीजे-१९-एएफ-३१४७) ने धुळ्याकडून अमळनेरकडे येत होते. त्यावेळी अमळनेरकडून येणाऱ्या मोटरसायकल (एमएच-१८-सी-८७१९) व तिच्या मागे असलेल्या एसटी बस (एमएच-१३-सीयू-७५४०) ला कारची जोरदार धडक बसली.
धडक इतकी भीषण होती की मोटरसायकलस्वार पशुवैद्यकीय अधिकारी निलेश सुखदेव तावडे (वय २५, रा. मालपूर, ता. शिंदखेडा) हे हवेत फेकले जाऊन जागीच ठार झाले. त्यांच्या मागे बसलेली फाल्गुनी उर्फ सोनल एकनाथ चव्हाण (भोई), सध्या मुक्काम उदना, सुरत हिचा देखील गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला. सोनल ही धरणगाव येथे मामाकडे एसवायबीए परीक्षेसाठी आली होती. मैत्रिणीसोबत अजिंठा येथे जाऊन येते असे सांगून ती घराबाहेर पडली होती. तर निलेश तावडे पहाटे पाच वाजता मालपूर येथून निघाले होते. अपघातात मोटरसायकलचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. कारमधील सुरेश विक्रम महाजन (वय ५२), नंदलाल गोपाल महाजन (वय ६०), निर्मलबाई नंदलाल महाजन (वय ५४) आणि अनिता सुरेश महाजन (वय ४०), सर्व रा. व्यारा, गुजरात, मूळ रा. अंबापिंप्री, ता. पारोळा यांचा डोक्याला व शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला.
अपघातात कार चालक आदित्य चंद्रकांत महाजन (वय २३) गंभीर जखमी झाला. तो कारमध्ये अडकून पडल्याने पोलिस व ग्रामस्थांनी लोखंडी टामीच्या सहाय्याने कारचा पत्रा उचकावून त्याला बाहेर काढले. त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून त्याच्यावर धुळे येथे उपचार सुरू आहेत. त्याच्या भावाचे १७ जून रोजी लग्न असल्याने साखरपुड्याच्या निमित्ताने तो लग्नपत्रिका वाटण्यासाठी आला होता.
११२ पथकाची तत्पर मदत
अपघाताची माहिती मिळताच अवघ्या पाच मिनिटांत पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे, चालक रवींद्र पाटील व पोलीस पाटील भागवत पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने जखमी आदित्य महाजन याला बाहेर काढून १०८ रुग्णवाहिकेद्वारे धुळे येथे रवाना केले. अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तसेच एसटीमधील दीपक दिलीप पाटील यांनाही किरकोळ दुखापत झाल्याने उपचारासाठी पाठविण्यात आले.
या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने अमळनेर येथे होणारा साखरपुडा रद्द करण्यात आला. माळीवाडा परिसरात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. कुटुंबीयांच्या आक्रोशाने वातावरण हेलावून गेले होते. सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे व उदय बोरसे यांनी पंचनामा केला. कारमधील चौघांवर अंबापिंप्री येथे, निलेश तावडे यांच्यावर मालपूर येथे तर फाल्गुनी चव्हाण हिच्यावर धरणगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुसऱ्या अपघातात पातोंड्याजवळ युवकाचा मृत्यू
दरम्यान, अमळनेर तालुक्यातील दहिवद-पातोंडा मार्गावर रोटवद येथील चेतन उर्फ विकी महाजन याचा मोटरसायकल (एमएच-१९-ओटी-५२४०) अपघातात मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. ८ जूनच्या रात्री झालेल्या या अपघातानंतर तो रात्रभर रस्त्याच्या कडेला पडून होता. अमळनेरहून रोटवदकडे जात असताना हा अपघात झाला असल्याचा अंदाज आहे. रात्री घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. सकाळी नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. चेतन महाजन याची आई दिव्यांग असून त्याच्या पश्चात लहान मुलगा असा परिवार आहे. हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply