
बोहरे येथील प्रलंबित भूसंपादन व संपूर्ण पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार : आमदार अनिल पाटील
जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक; पुढील तापी महामंडळ बैठकीत निर्णयाची शक्यता
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील बोहरे येथील पाडळसरे धरण प्रकल्पाअंतर्गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भूसंपादन व संपूर्ण पुनर्वसनाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात १३ एप्रिल रोजी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत बोहरे गावातील प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पाडळसरे धरणामुळे बाधित झालेल्या शेतकरी व ग्रामस्थांच्या भूसंपादन आणि पुनर्वसनाचा विषय तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले. बोहरे गावावर विशेष लक्ष केंद्रित करून पुढील तापी महामंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेऊन आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले.
या निर्णयामुळे बोहरे गावाचा अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. बैठकीनंतर उपस्थित ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी आमदार अनिल पाटील यांचे आभार मानत प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. या बैठकीस माजी मदत व पुनर्वसन मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, तापी पाटबंधारे विभागाचे महाजन व य. म. कडलग, तसेच महसूल विभागातील अधिकारी उपस्थित होते. याशिवाय ग्रामस्थ अनिल अहिरराव, यशवंत पाटील, दीपक पाटील, सुभाष बागुल, हेमंतराव विंचूरकर, कैलास विंचूरकर, रतन धनगर, अशोक कोळी, दिलीप कोळी, सुधाम बागुल, मनोज रत्नपारखी, प्रमोद बागुल, जयेश बागुल, भूषण धनगर आदी उपस्थित होते. या बैठकीमुळे बोहरे गावाच्या विकासाला गती मिळणार असून बाधित शेतकरी व नागरिकांच्या न्याय्य मागण्यांना लवकरच दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply