भरधाव रेतीच्या डंपरची धडक; ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू, डंपर चालकावर गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) शहरात भरधाव वेगाने धावणाऱ्या रेतीच्या डंपरने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या ६५ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक १३ रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सदरुद्दीन शेख अब्दुल (वय ६५, रा. जोशीपुरा, पिंपळे रोड, अमळनेर) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही दुर्घटना दिनांक १२ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता धुळे रोडवरील डॉ. किरण बडगुजर यांच्या श्री दत्त हॉस्पिटलसमोर घडली होती.

या घटनेत डंपर (क्रमांक एमएच ४१ बीटी २०२१) वरील चालक रोशन शंकर खराटे (रा. लोहनेर, ता. देवळा, जि. नाशिक) याने आपले वाहन हयगयीने व बेदरकारपणे चालवत रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. त्याने पायी चालत असलेल्या सदरुद्दीन शेख अब्दुल यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर जखमींना रिक्षाने अमळनेर येथील डॉ. सुमित सूर्यवंशी यांच्या श्री एक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी महेमूदखान मजीदखान पठाण (रा. जोशीपुरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात डंपर चालक रोशन खराटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रमोद पाटील करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *