पैलाड नाक्यावर डिझेल संपल्याने लक्झरी बस बंद; अर्धा तास वाहतूक ठप्प

वाहतूक पोलिसांच्या तत्परतेने डिझेलची व्यवस्था; मोठी कोंडी टळली

 

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील पैलाड नाक्यावर डिझेल संपल्याने राजमुद्रा ट्रॅव्हल्सची लक्झरी बस भर रस्त्यातच बंद पडल्याची घटना घडली. यामुळे सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प होऊन मोठी कोंडी निर्माण झाली. पेट्रोल पंपावरही डिझेल शिल्लक नसल्याने चालक हतबल झाला होता.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दिनांक ५ रोजी राजमुद्रा ट्रॅव्हल्सची लक्झरी बस चोपडा येथून अमळनेरकडे येत होती. पैलाड नाक्यावर आल्यानंतर अचानक बसमधील डिझेल संपल्याने ती बंद पडली. चालकाने जवळील पेट्रोल पंपावर संपर्क साधला असता तेथेही डिझेलचा साठा संपल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे बस रस्त्याच्या मध्यभागीच उभी राहिल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या व वाहतूक खोळंबली. दरम्यान, शहरात सुरू असलेल्या डिझेल तुटवड्यामुळे अशा घटना वारंवार घडत असून वाहनधारक व नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाने इंधन पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 

यात्रोत्सवामुळे परिस्थिती गंभीर

 

घटनास्थळापासून काही अंतरावर यात्रोत्सव सुरू असल्याने परिसरात वाहनांची मोठी वर्दळ होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वाहतूक पोलिस संजय बोरसे व रविंद्र बोरसे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वाहतूक नियंत्रणात ठेवत पर्यायी व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

 

कृष्णा पेट्रोलियमकडून डिझेलची व्यवस्था

 

वाहतूक पोलिसांनी कृष्णा पेट्रोलियमचे लालचंद सैनानी यांच्या मदतीने तातडीने डिझेल उपलब्ध करून दिले. त्यानंतर बंद पडलेली लक्झरी बस सुरू करण्यात आली व ती मार्गस्थ झाली. बस हटवल्यानंतर पैलाड नाक्यावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा गोंधळ टळल्याने नागरिकांनी त्यांचे कौतुक केले.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *