
अवैध वाळू वाहतुकीवर अमळनेर पोलिसांची पहाटे धाड; सहा ट्रॅक्टर पकडले ; वाहनमालकांचा शोध सुरू
अमळनेर (प्रतिनिधी) बोरी, पांझरा आणि तापी नदीपात्रातून गेल्या काही दिवसांपासून अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक केली जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत अमळनेर पोलिसांनी पहाटे धडक कारवाई केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या संयुक्त पथकाने २८ जुलै रोजी पहाटे हिंगोणे शिवारातील बोरी नदीकाठावर धाड टाकून सहा ट्रॅक्टर पकडले. याप्रकरणी सहा चालकांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्यरात्रीच्या सुमारास वाळू चोरी करून गल्लीबोळातून भरधाव वेगाने ट्रॅक्टरची वाहतूक सुरू होती. त्यामुळे नागरिकांच्या झोपेचा खोळंबा होत असून, अवैध गौण खनिज वाहतुकीमुळे शासनाचा महसूलही बुडत असल्याच्या तक्रारी होत्या. यापूर्वीही पोलिसांनी कारवाईचा प्रयत्न केला असता वाळू वाहतूक करणारे चालक वाहनांसह पळून जात होते. या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी गोपनीयता राखत कारवाईचे नियोजन केले. २८ जुलै रोजी पहाटे एक ते पाच वाजेदरम्यान पोलिसांच्या पथकाने हिंगोणे शिवारातील बोरी नदीच्या काठावर धाड टाकली. यावेळी काही ट्रॅक्टर अवैधरीत्या वाळू वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांचे पथक दिसताच काही चालकांनी वाहनांसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी नदीपात्रातील गुडघाभर पाण्यातूनही त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. कारवाईत पाच विनानंबरचे ट्रॅक्टर ट्रॉलीसह, तसेच क्रमांक एमएच १९ सीजे ७७५ असलेले एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह असे सहा ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत योगेश नामदेव भोई (वय २५, रा. रुबजी नगर), प्रवीण सुधाकर सोनवणे (वय ३६, रा. हिंगोणे खुर्द), राहुल छोटू ठाकरे (वय २०, रा. रुबजी नगर), अर्जुन अशोक मालचे (वय २५, रा. हिंगोणे खुर्द), सतीश मोहन बाविस्कर (वय ३५, रा. हिंगोणे खुर्द) आणि सोमनाथ मधुकर मोरे (वय २०, रा. रुबजी नगर) या सहा चालकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील वाहनमालकांचा पोलीस शोध घेत आहेत.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल सुनील तेली, विनोद संदानशीव, मयुर पाटील, प्रमोद बागडे, हितेश बेहरे आणि गणेश पाटील यांच्या पथकाने केली.
कोणाचीही गय केली जाणार नाही
“अवैध गौण खनिज वाहतुकीबाबत कठोर भूमिका घेण्यात आली असून, यापुढे प्रत्येकावर कारवाई केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही. विनानंबरच्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाकडूनही कारवाई केली जाईल,”
– विनायक कोते, उपविभागीय पोलीस अधिकारी

Leave a Reply