मुली इतर समाजात दिल्यास बहिष्काराचा इशारा; आदिवासी संघटनांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

अमळनेर (प्रतिनिधी) आदिवासी समाजातील मुली इतर समाजात विवाहासाठी दिल्यास किंवा विकल्यास संबंधित कुटुंबीयांशी कोणताही सामाजिक संबंध ठेवला जाणार नाही, तसेच अशा कुटुंबांना आदिवासी समाजातून बहिष्कृत करण्यात येईल, अशी भूमिका मांडणारे निवेदन सोमवारी, २४ ऑगस्ट रोजी प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले. ज्या समाजामध्ये मुलीचा विवाह झाला आहे, त्या समाजामध्ये संबंधित कुटुंबाला समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.

यावेळी नाशिक येथे आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषण करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनालाही उपस्थितांनी पाठिंबा दर्शविला. विद्यार्थ्यांच्या मागण्या शासनाने गांभीर्याने घेऊन त्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन देण्यात आले असून, मागण्यांबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास आगामी काळात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या वेळी एकलव्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गुलाब बोरसे, एकलव्य संघटनेचे अमळनेर तालुका अध्यक्ष भैय्या सोनवणे, अमळनेर तालुका रावण ग्रुपचे अध्यक्ष नरेश चव्हाण, अजय भाऊ, सागर भाऊ, एकलव्य संघटनेचे उपाध्यक्ष आबा बहिरम, अमळनेर तालुक्याचे वरिष्ठ कार्यकर्ते धनराज मालचे, ढेकू गावाचे वरिष्ठ कार्यकर्ते रावसाहेब पवार, एकलव्य संघटनेचे जिल्हा सल्लागार विनायक सोनवणे, ज्येष्ठ कार्यकर्ते खैरनार दादा, पारधी समाजाचे कार्यकर्ते भुरा पारधी, नितीन भाऊ, राहुल भाऊ आदी उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *