
श्री मंगळग्रह मंदिरात आज श्री सत्यनारायण महापूजा
अमळनेर (प्रतिनिधी) : श्रावण पर्वानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात मंगळवार, दि. २५ ऑगस्ट रोजी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे.
महापूजेचे विशेष मानकरी नगरसेवक श्रीराम चौधरी व त्यांच्या धर्मपत्नी सौ. सुरेखाताई चौधरी हे दाम्पत्य असून, त्यांच्या हस्ते सकाळी साडेनऊच्या सुमारास या महापूजेची मंत्रोच्चारांसह विधिवत सुरुवात होईल. श्रावण पर्वातील भगवान विष्णूंच्या सत्यनारायण स्वरूपाची महापूजा करणे अतिशय पवित्र व पुण्यफल प्राप्तीचे मानले जाते. या काळात वातावरण पूर्णपणे सात्त्विक असते. त्यामुळे या पवित्र महापूजेवेळी शहरासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासह तीर्थप्रसादासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे. भाविकांसाठी सकाळी ९ वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत दर्शन व तीर्थप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave a Reply