खोकरपाट सरपंच नितीन पाटील यांचा भाजपला रामराम; राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही : आमदार अनिल भाईदास पाटील

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील खोकरपाट बहादरवाडी समूह ग्रामपंचायतीचे नवनियुक्त सरपंच नितीन आप्पा पाटील यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी भारतीय जनता पक्ष आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. अनेक वर्षे भाजपमध्ये सक्रिय राहिल्यानंतर त्यांनी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यापूर्वी सरपंच रमेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर नितीन आप्पा पाटील यांची सरपंचपदी निवड झाली असून त्यांनी पदभार स्वीकारला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये नवनियुक्त सरपंच नितीन आप्पा पाटील, नवनियुक्त सोसायटीचे अध्यक्ष मानसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, विकास पाटील, श्रीराम पाटील, विशाल पाटील, भाऊसाहेब पाटील आणि राजेंद्र पाटील यांचा समावेश होता. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शेतकी संघ संचालक रणजित भीमसिंग पाटील, हेमंत पवार, जितू ठाकूर, माजी सरपंच दिनेश पाटील (पिंपळे), अलीम मुजावर, एल. टी. पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला उत्तम भाऊसाहेब पाटील, रमेश पाटील, रामसिंग पाटील, बापू पाटील, अंबालाल पाटील, संजय पाटील, विजयसिंह पाटील, प्रदीप पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधताना नव्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. खोकरपाट बहादरवाडी परिसरातील विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल तसेच विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. खोकरपाट बहादरवाडी येथील सरपंच आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या या पक्षप्रवेशामुळे परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाल्याची चर्चा असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्थानिक पातळीवर मोठे बळ मिळाल्याचे बोलले जात आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *