ऑनलाइन फार्मसीविरोधात अमळनेर तालुका औषध विक्रेत्यांचा कडकडीत बंद; तहसीलदारांना निवेदन

अमळनेर (प्रतिनिधी) : ऑनलाइन फार्मसीच्या माध्यमातून होत असलेल्या औषध विक्रीवर तातडीने बंदी घालण्यात यावी, तसेच केंद्र सरकारने कोविड काळात लागू केलेला GSR220(E) आदेश मागे घ्यावा या प्रमुख मागण्यांसाठी अमळनेर तालुका औषध विक्रेता संघाने बुधवारी (दि. २०) एक दिवसाचा कडकडीत बंद पाळत तहसीलदारांना निवेदन दिले.

तालुक्यातील औषध विक्रेत्यांनी सकाळी १०.३० वाजता विजय मारुती मंदिरापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. यावेळी ऑनलाइन फार्मसीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्च्यानंतर तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशभरात इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून बेकायदेशीररीत्या औषधांची ऑनलाइन विक्री सुरू असून, याबाबत अनेक वेळा शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र, शासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अखेर बंद आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागला.

ऑनलाइन फार्मसीमुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून, बंदी असलेली औषधे देखील सहज उपलब्ध होत असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध पुरवठा होणे हे अत्यंत धोकादायक असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले.

दरम्यान, बंद काळात रुग्णांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवेसाठी प्रशासनाकडे संपर्क क्रमांक देण्यात आले होते. शहर व तालुक्यातील २०० हून अधिक औषध विक्रेता दुकानदारांनी या बंदमध्ये सहभाग नोंदविला.

यावेळी अमळनेर तालुका औषध विक्रेता संघाचे अध्यक्ष प्रशांत पाटील, उपाध्यक्ष निलेश पाटील, सचिव प्रवीण माळी, खजिनदार रवींद्र चौधरी, जिल्हा प्रतिनिधी नरेंद्र पाटील, सुनील छाजेड, मुरलीधर चौधरी, सचिन चोपडा, हर्षल जैन, महेश पवार यांच्यासह मोठ्या संख्येने औषध विक्रेते उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *