
मारवडच्या उज्ज्वला माळीची हिंदी विषयात विद्यापीठात बाजी; सुवर्णपदकाने होणार सन्मानित
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाची विद्यार्थिनी उज्ज्वला भरत माळी हिने आपल्या जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्याच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत घेण्यात आलेल्या टी.वाय.बी.ए. परीक्षेत हिंदी विषयात विद्यापीठातून प्रथम क्रमांक पटकावत तिने सुवर्णपदकाचा बहुमान मिळवला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उज्ज्वला माळी हिने अभ्यासातील सातत्य, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळवले. तिच्या या कामगिरीमुळे मारवड महाविद्यालयाचा विद्यापीठ स्तरावर गौरव झाला आहे. तिच्या यशाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक प्रगतीसाठी प्रेरणा मिळाली आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालयात शिक्षण घेत विद्यापीठ स्तरावर प्रथम क्रमांक मिळवण्याची कामगिरी केल्याने उज्ज्वला हिचे सर्वत्र कौतुक होत असून, तिच्या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक लौकिकात भर पडली आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आबासो. जयंतराव मन्साराम पाटील, उपाध्यक्ष आबासो. देविदास शामराव पाटील, सचिव आबाजी देविदास बारकू पाटील, सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. देसले, सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी उज्ज्वला माळी हिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply