
महापुरग्रस्तांना दिलासा; अमळनेर शहरातील बाधितांना आज ८ केंद्रांवर किराणा किट वाटप
अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर तालुक्यात ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अमळनेर नगरपरिषद हद्दीतील नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंसह किराणा किटचे वाटप आज, १४ ऑगस्ट रोजी करण्यात येणार असून त्यासाठी प्रशासनाने सर्व नियोजन पूर्ण केले आहे. तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालयाने यासंदर्भात सविस्तर आदेश जारी करत विशेष पथकांची नियुक्ती केली आहे.
३१ जुलैच्या महापुरामुळे शहरातील शेकडो कुटुंबांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर नुकसानग्रस्तांना तातडीची मदत मिळावी यासाठी प्रशासनाने सर्वेक्षण, पंचनामे आणि मदत वितरणाची प्रक्रिया सुरू केली होती. त्याचाच एक भाग म्हणून आज किराणा किट वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
प्रशासनाने सर्व बाधित नागरिकांना निश्चित केंद्रांवर वेळेत उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले असून मदत वाटप प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले आहे.
या ठिकाणी होणार वाटप
बाधित नागरिकांना मदत सहज उपलब्ध व्हावी यासाठी शहरात एकूण ८ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. आज सकाळी १० वाजेपासून भोई समाज मंगल कार्यालय (पैलाड), शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र (ताडेपुरा), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह (गांधलीपुरा), संत सखाराम महाराज वाडी, शिवाजी विद्या मंदिर (तांबेपुरा), क्षत्रिय कांचमाळी पंचमढी (बहादरपूर नाका रोड), शिवम कुटी बोर्डाजवळ (झामी चौक) आणि विद्या विहार कॉलनी गेटजवळ या केंद्रांवर साहित्य वाटप सुरू होणार आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, प्रत्येक बाधित कुटुंबाला एक किराणा किट देण्यात येणार आहे. मदतीचा लाभ घेण्यासाठी संबंधित नागरिकांनी स्वतःची किंवा कुटुंबातील सदस्याची ओळख पटवणे आवश्यक राहणार आहे. वाटप प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी लाभार्थ्यांचे छायाचित्र घेण्यात येणार असून मदत स्वीकारल्याची स्वाक्षरीदेखील नोंदविण्यात येणार आहे.

Leave a Reply