
मिडटाऊन हॉटेलसह गोकलानी समूहाच्या आस्थापनांवर गंभीर आरोप, सोमचंद संदानशिव यांचे स्वातंत्र्यदिनापासून आमरण उपोषण
‘नाव मोठे, पण लक्षण खोटे?’; लहान व्यापाऱ्यांवर नियमांचा बडगा, मग धनाढ्यांसाठी वेगळे निकष का?

अमळनेर (प्रतिनिधी) शहरात आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात मोठे नाव कमावलेल्या व्यावसायिकांबाबत आता थेट प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. “नाव मोठे, पण लक्षण खोटे” अशी बोचरी टीका करत महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत संवर्ग अधिकारी-कर्मचारी संघटनेचे नाशिक विभागाध्यक्ष सोमचंद संदानशिव यांनी सरजू गोकलानी यांच्या मालकीच्या मिडटाऊन हॉटेलसह अन्य व्यावसायिक आस्थापनांबाबत गंभीर आरोप उपस्थित केले असून, या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी व्हावी या मागणीसाठी १५ ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
सोमचंद संदानशिव यांच्या म्हणण्यानुसार, शहरातील सर्वसामान्य आणि लहान व्यापाऱ्यांकडून प्रत्येक कराची काटेकोर वसुली केली जाते, मात्र मोठ्या आर्थिक सामर्थ्य असलेल्या व्यावसायिकांच्या बाबतीत प्रशासनाची भूमिका तितकीच कठोर आहे का, हा खरा प्रश्न आहे. मिडटाऊन हॉटेलच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध व्यावसायिक उपक्रमांसह मल्टिप्लेक्स, मंगल कार्यालये, बँका आणि इतर व्यावसायिक वापराच्या मालमत्तांवर नियमानुसार करआकारणी झाली आहे का, याची सखोल चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. संदानशिव यांचा आरोप आहे की, जर मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक वापर होत असेल आणि त्यानुसार करआकारणी झाली नसेल, तर त्याचा थेट फटका नगरपरिषदेच्या महसुलाला बसला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगरपरिषदेने संबंधित मालमत्तांची करआकारणी, नोंदी आणि महसूल तपशील सार्वजनिक करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी. “नगरपरिषदेच्या तिजोरीत जाणारा पैसा जर कुठे अडकत असेल, तर तो शहराच्या विकासावर अन्याय आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. सफाई कामगारांच्या घरांच्या प्रश्नावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारी २०१७ मध्ये नदीकाठावरील घरे हटविताना संबंधित सफाई कामगारांना टाकरखेडा रस्त्यावरील म्हाडाच्या ४६२ घरांमध्ये सदनिका देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. अनेकांनी त्यासाठी रक्कम भरून पावत्या घेतल्या, मात्र आजही अनेक कुटुंबे स्वतःच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. “ज्यांच्या हातात शहराची स्वच्छता आहे, त्यांच्याच डोक्यावर कायमस्वरूपी छप्पर नाही, ही शोकांतिका आहे,” असे संदानशिव यांनी म्हटले आहे. याशिवाय गलवाडे रस्त्यावरील ठगू आई रिसॉर्ट परिसरातील कथित अतिक्रमणाचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. विकास आराखड्यातील रस्ता बंद झाल्याचा आरोप करत सार्वजनिक रस्ते कोणाच्याही प्रभावामुळे अडवले जाऊ नयेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. संबंधित ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमण असल्यास ते हटवावे आणि नागरिकांसाठी रस्ता खुला करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. “शहरात कायदा सर्वांसाठी समान आहे की नाही, याचीच आता परीक्षा आहे,” असे सांगत संदानशिव यांनी करआकारणीतील कथित अनियमितता, सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न, डीपी रस्त्यावरील कथित अतिक्रमण आणि इतर मागण्यांवर प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्यात येईल, असा ठाम इशारा दिला आहे. दरम्यान, या सर्व आरोपांबाबत सरजू गोकलानी, संबंधित आस्थापना किंवा नगरपरिषद प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. संबंधितांची बाजू उपलब्ध झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply